Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांची धमकी; सरकारने तातडीने वाढवली सुरक्षा!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : गडचिरोलीचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मिलिंद तेलतुंबडेसह कुख्यात नक्षलवाद्यांना पोलिसांनी चकमकीत मारल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातून शिंदे यांना धमक्या येऊ लागल्या आहेत. त्या धमक्यांची दखल घेत शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. (Naxals threaten Eknath Shinde; Government immediately increased security)

मुंबईत मंत्रालयात झालेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या आढाव्यादरम्यान नगरविकास मंत्री शिंदे यांची सुरक्षा वाढवण्याचे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. गृहखाते सुरक्षा व्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेत असते. धमक्यांचे निरोप आणि गुप्तचर खात्याचे अहवाल लक्षात घेता सुरक्षा वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेण्यात येतो. मंत्रालयात झालेल्या बैठकीत शिंदे यांच्या सुरक्षेसंबंधीचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती शंभूराजे देसाई यांनी दिली.

दरम्यान नक्षलवाद्यांकडून आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मी धमक्यांना घाबरत नाही. यापूर्वीही मला अनेक धमक्या आल्या आणि गेल्या. त्याचा परिणाम माझ्यावर कधीच झाला नाही, त्यामुळे मला सुरक्षा द्यायची की नाही, याचा निर्णय गृहविभाग घेईल. मात्र, नक्षलवाद कमी करायचा असेल, तर विकास हाच एक पर्याय आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोलीत पालकमंत्री म्हणून आपण विकासकामे करण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग हा नागपुरपासून पुढे गडचिरोली, गोंदिया, भंडारापर्यंत नेणार आहोत, असेही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT