NCB Team
NCB Team  
मुंबई

एनसीबीचं पथक मुंबईत; प्रभाकर साईल अन् वानखेडेंची होणार चौकशी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे अडचणीत आले आहेत. अखेर वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाल्याचे एनसीबीने जाहीर केले आहे. चौकशीसाठी एनसीबीचे 5 सदस्यांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. वानखेडेंना अडचणीत आणणारा पंच प्रभाकर साईल याचाही जबाब हे पथक नोंदवणार आहे.

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि क्रूझ पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांमुळे वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी एनसीबीचे 5 सदस्यांचे पथक दिल्लीहून आज मुंबईत दाखल झाले आहे. या पथकात एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांच्यासह 5 अधिकारी आहेत. आता हे पथक प्रभाकर साईल याचा जबाब नोंदवणार आहे. याचबरोबर वानखेडे यांचाही जबाब नोंदवणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही साईलने केला आहे. वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही साईल यांनी सांगितले होते. आपल्या जीवाला धोका असल्याने एवढे दिवस आपण गप्प होतो, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता.

क्रूझ पार्टीप्रकरणात पुरावे म्हणून साईलने काही फोटो आणि व्हिडीओ देखील सादर केले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये आर्यनला अटक करून एनसीबी कार्यालयात आणल्यानंतर किरण गोसावी आर्यन खानजवळ बसून त्याच्या फोनवरून कुणाशी तरी बोलणे करून देत असल्याचे दिसत होते. साईल यांला आता मुंबई पोलिसांनी संरक्षण दिले आहे. त्याच्या तक्रारीवर पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे.

वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाल्याची माहिती एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांनी दिली होती. ते म्हणाले होते की, या प्रकरणी उपमहासंचालकांनी दिलेला अहवाल एनसीबीच्या संचालकांना मिळाला आहे. त्यांनी या प्रकरणी दक्षता विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करतील. चौकशी आताच सुरू झाली असून, कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल लगेच टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT