Bacchu Kadu On Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Bacchu Kadu : "अजितदादा महायुतीतून बाहेर पडतील अन्..."; बच्चू कडूंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?

Jagdish Patil

Bachchu Kadu News : विधानसभेची निवडणूक अगदी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात ही निवडणूक घेतली जाईल असा अंदाज वर्तवला आहे. यासाठी आता विविध पक्षातील नेत्यांनी दौरे आणि सभांचा सपाटा सुरु केला आहे.

विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले असले तरी, या निवडणुकीत सर्वात कळीचा मुद्दा ठरणार आहे तो जागावाटपाचा. कारण राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुती यांच्यात प्रमुख लढत होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

मात्र, अशातच काही नेते मिळून राज्यात आणखी एक तिसरी आघाडी करत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतून (Mahayuti) बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. याच चर्चां संदर्भात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

"सध्या अशी अनेक चिन्ह आहेत ज्यातून असं दिसतंय की अजित पवार (Ajit Pawar) महायुतीतून बाहेर येतील. किंबहुना ते आमच्यात येतील आणि महाशक्ती तयार होईल." असं वक्तव्य कडू यांनी केलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पत्रकारांनी कडू यांना पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता बच्चू कडू म्हणाले, पंकजा मुंडे यांचं खरं आहे, विधानसभेसाठी आता धनंजय मुंडे आहेत.

अजित पवार जर महायुतीतून बाहेर गेले तरच त्यांची जागा त्यांना मिळेल. अन्यथा त्यांना जागा मिळणार नाही. सगळ्या आघाडी आणि युतीमध्ये बरीच फाटाफूट होईल असं चित्र सध्या आहे. ते बाहेर पडतील आणि आमची महाशक्ती होईल. त्यांना आमच्या आघाडीत घ्यायचं की नाही हे आमची सुकाणू समिती ठरवेल. ते महायुतीमधून बाहेर पडतील असे काही संकेत आहेत. जशी तुमची सूत्र असतात तशी आमचेही सूत्र असतात", असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.

अजित पवारांचं महायुतीला वावडं?

त्यामुळे आता महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा असलेले अजित पवार खरंच महायुतीतून बाहेर पडणार का? या चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला समाधानकारक यश मिळालं नाही. या निवडणुकीत महायुतीला मोठ्या पराभावाचा सामना करावा लागला.

तेव्हापासून युतीतील खासकरून भाजपमधील नेते पदाधिकारी अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा, अशी उघड वक्तव्य करत आहेत. शिवाय शिंदे गटातील नेत्यांनाही अजित पवारांमुळे होत असलेली मळमळ लपून राहिलेली नाही. याच सर्व कारणामुळे आता अजितदादांची कोंडी करून त्यांना महायुतीतून वेगळं करण्याचा डाव सुरु असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT