Sharad pawar On LK Advani Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar : लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शरद पवार काय म्हणाले?

Sharad pawar On LK Advani Bharat Ratna : "अडवाणींनी काढलेल्या रथयात्रेवरून आमच्यात मतभेद होते, मात्र...", असंही शरद पवारांनी म्हटलं.

सरकारनामा ब्युरो

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी ( LK Advani ) यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) यांनी ट्विट करत याबाबतची घोषणा केली आहे. भारतीय राजकारणातील योगदानाबद्दल लालकृष्ण अडवाणी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

शरद पवार म्हणाले, "भारतरत्न पुरस्कारासाठी कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांची नावं अतिशय योग्य आहे. कर्पुरी ठाकूर यांनी समाजातील दुबळ्या वर्गासाठी काम केलं. विचारांच्या बाबतीत कर्पुरी ठाकूर भक्कम होते. त्यामुळे ठाकूर यांची निवड योग्य आहे."

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

"...तर अडवाणींचा पराभव कधी झाला नव्हता"

"लालकृष्ण अडवाणी देशाच्या संसदेत अनेक वर्षे होते. एखादा-दुसरा अपवाद सोडला, तर अडवाणींचा पराभव कधी झाला नव्हता. सार्वजनिक जीवनात एक स्वच्छ चरित्राचे व्यक्ती म्हणून अडवाणींचं नाव लौकिक आहे. अडवाणींनी काढलेल्या रथयात्रेवरून आमच्यात मतभेद होते. या रथयात्रेमुळे न घडणाऱ्या अशा गोष्टी देशात घडल्या. मात्र, तेवढा अपवाद सोडला, तर भाजपाचे नेते आणि संसदीय सदस्य म्हणून अडवाणींचं जीवन आदर्शवादी आहे. थोडा उशीर झाला, पण अडवणींची भारतरत्नसाठी झालेली निवड योग्य आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो," असं शरद पवारांनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

"लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर करताना आनंद होत आहे. मी लालकृष्ण अडवाणी यांच्याशी फोनवरून संवाद साधत भारतरत्न पुरस्काराबद्दल माहिती दिली. लालकृष्ण अडवाणी अलीकडच्या काळातील सर्वाधिक सन्मान मिळालेले राज्यकर्ते आहेत. शेवटच्या घटकापासून कामाला सुरूवात करून उपपंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारत अडवाणींनी देशाची सेवा केली आहे. त्यांनी गृह खातं आणि माहिती-प्रसारण मंत्री म्हणून देखील काम केलं," असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

Edited By : Akshay Sabale

SCROLL FOR NEXT