Sharad Pawar Vs Chhagan Bhujbal - Abdul Karim Telgi Sarkarnama
मुंबई

Telgi Fake Stamp Scam: राष्ट्रवादी फुटली अन् स्टॅम्प घोटाळ्याची पुन्हा राळ उठली; काय आहे 'तेलगी' प्रकरण?

Abdul Karim Telgi Fake Stamp Scam: तेलगी बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यामुळे तत्कालीन मंत्री छगन भुजबळांना राजीनामा द्यावा लागला

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News: बीडच्या सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटाकडून एकमेकांची उणीदुणी काढणे सुरू झाले आहे. मंत्री छगन भुजबळांनी तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळ्यात काही चूक नसतानाही राजीनामा घेतल्याने ज्येष्ठ नेते शरद पवारांना लक्ष्य केले. 'तुमच्यावरही अनेक आरोप झाले होते, त्यावेळी तुमचा कुणी राजीनामा मागितला नाही, तुम्हीही दिला नाही', असे म्हणत भुजबळांनी तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात नाहक बदनामी झाल्याचा रोष व्यक्त केला. या आरोपानंतर माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनीही या घोटाळ्यावरून भुजबळांना लक्ष्य केले. (Latest Political News)

तेलगी बनवाट स्टॅम्प प्रकरण नाशिकमध्ये घडल्याने तत्कालीन मंत्री छगन भुजबळांभोवती संशयाचा धुरळा जमा झाला होता. परिणामी शरद पवारांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. याची सल भुजबळांनी बीडच्या सभेत बोलून दाखवली. यानंतर राष्ट्रवादीतील उठलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे राज्यात पुन्हा एकदा तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळ्याची चर्चा सुरू झालेली आहे. भुजबळांनी केलेल्या टीकेला शरद पवार काय उत्तर देणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान, तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा नेमका काय होता, याची उत्सुकता लागली आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर तेलगी बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा हा हर्षद मेहताने १९९२ मध्ये केलेल्या शेअर बाजार घोटाळ्यापेक्षा सहा पटीने मोठा आहे.

काय आहे तेलगी बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा ?

सन २००१ मध्ये उघडकीस आलेल्या भारतातील सर्वात मोठ्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा मास्टरमाईंड अब्दुल करीम तेलगी होता. बनावट स्टॅम्प पेपरचे उत्पादन आणि विक्री या घोटाळ्यात सरकारला ३० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तेलगीचा जन्म १९५६ मध्ये कर्नाटकातील एका छोट्या गावात झाला. त्याने सुरुवातीला पोटापाण्यासाठी फळ विक्रेते म्हणून काम केले. याच काळात तो प्रवासी व्यवसायात आला आणि आखाती देशांमध्ये कामाच्या शोधात असलेल्या लोकांना बनावट इमिग्रेशन कागदपत्रे बनवून देऊ लागला.

तुरुंगात मिळाली 'आयडिया'

या प्रकरणी त्याला १९९१ मध्ये बनावट आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मात्र तुरुंगात जाणे हात तेलगीच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. तेथे त्याला स्टॅम्प पेपर घोटाळा राबविण्याची कल्पना सूचली. त्या काळी अनेक कायदेशीर बाबींसाठी स्टॅम्प पेपरची गरज भासत होती, पण कमी पुरवठा असल्याने त्यांची मागणी जास्त होती. अब्दुल करीम तेलगी तुरुंगात एका व्यक्तीला भेटला, ज्याने त्याला स्टॅम्प पेपरबद्दल सांगितले. या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर तेलगीने बनावट स्टॅम्प पेपर बनवण्याचे ठरवले आणि तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने हे काम सुरू केले.

नाशिकचा 'असा' संबंध..

नाशिकच्या रेल्वे स्थानकाजवळ एक छापखाना असून, तेथे मुद्रांक छापले जातात, अशी माहिती तेलगीला मिळाली. यानंतर तेलगीने सर्व प्रयत्न करून छपाईचे लिलावात जुने मशिन विकत घेतले आणि दुरुस्त केले. यानंतर काही लोकांच्या मदतीने बनावट शिक्के छापण्यास सुरुवात केली. मात्र, बनावट स्टॅम्प छापल्यानंतर त्यांची विक्री करणे हे मोठे आव्हान होते. यासाठी तेलगीने काही सुशिक्षित लोकांना कामावर घेतले आणि त्यांच्यामार्फत बनावट स्टॅम्प पेपर विकले.

तब्बल दहा वर्षे बनावट स्टॅम्पची विक्री

अब्दुल करीम तेलगीने बनावट स्टॅम्प पेपर सर्वसामान्य लोकांना तसेच बँका, ब्रोकरेज कंपन्या आणि विमा कंपन्यांना विकले. त्याने बनावट स्टॅम्प पेपर तसेच न्यायालयीन कोर्ट फी स्टॅम्प, नोटरी स्टॅम्पही बनवले. सुमारे त्याने १९९२ ते २००३ (Scam 2003) असे १० वर्षे अनेक शहरांमध्ये बनावट स्टॅम्प पेपर विकले आणि कोट्यवधी रुपये कमावल्याचे सांगितले जाते. उच्च प्रतिची छपाई आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या पाठिंबा यामुळेच तो हे रॅकेट दहा वर्षे चालवू शकला, असे बोलले जाते. या कामासाठी याच्‍याकडे शंभरहून अधिक लोकांचे नेटवर्क होते. यात अधिकाऱ्यांचाही समावेश होता.

अशी झाली भांडाफोड

बेंगळुरू पोलिसांनी २००० मध्ये तपासणीसाठी एक ट्रक आडवला. यात ट्रकभर बनावट स्टॅम्प पेपर असल्याचे उघड झाल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली. त्यानंतर या घोटाळा क्रमिकपणे उलगडण्यात आला. अब्दुल करीम तेलगीला २००१ मध्ये अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान तेलगीने अनेक गुपिते उघड केली होती. त्याने उत्तर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांसह, अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी पाठिशी घालत असल्याचे सांगितले.

अब्दुल करीम तेलगी घोटाळ्याची रक्कम

अब्दुल करीम तेलगीला २००७ मध्ये न्यायालयाने ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्याच्या अनेक साथीदारांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. न्यायालयाने तेलगीला २०२ कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तुरुंगात शिक्षेदरम्यान अवयव निकामी झाल्याने २०१७ मध्ये त्याचा मृत्यू झाला. १९९२ ते २००३ पर्यंत अब्दुल करीम तेलगीने ३० हजार कोटी रुपयांचा बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा केला होता.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT