Ajit Pawar Latest Marathi News
Ajit Pawar Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

'राष्ट्रवादी'च्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच असं घडलं अन् अजितदादांना मिळाला पहिला मान!

Rajanand More

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला 23 वर्ष पूर्ण झाली आहे. या 23 वर्षांच्या कालखंडात जवळपास 17 वर्ष हा पक्ष सत्तेत होता. तर केवळ पाच वर्ष राष्ट्रवादीला विरोधात बसावे लागले. काँग्रेसशी आघाडी करत राष्ट्रवादीने नेहमीच सत्तेची फळ चाखली. या 23 वर्षात पक्षाला पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा मान मिळाला. पण हे पद अनेक नाट्यमय घडामोडींनंतर राष्ट्रवादीच्या पदरात पडले आहे. (Ajit Pawar Latest Marathi News)

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात सोमवारी अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यांच्यारूपाने पक्षाला पहिला विरोधी पक्षनेता मिळाला. राष्ट्रवादीच्या (NCP) स्थापनेपासून आतापर्यंत सात जणांना हा मान मिळाला होता. त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि विजय वडेट्टीवार वगळता सर्वजण भाजप किंवा शिवसेनेचे नेते होते.

राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत पक्षाला 58 जागा मिळाल्या. तर काँग्रेसला (Congress) 75 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी दोन्ही पक्षांची आघाडी झाली अन् विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनले. त्यानंतर 2014 पर्यंत आघाडीचीच सत्ता राहिली. या काळात नारायण राणे, रामदास कदम, एकनाथ खडसे, एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी होती.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत आघाडीची सत्ता गेली आणि भाजप-शिवसेना युती सत्तेत आली. या निवडणुकीत काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा अधिक जागा असल्याने त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद गेले. सलग पाच वर्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे पद भूषविले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पाच महिन्यांसाठी वडेट्टीवार विरोधी पङनेते बनले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. सर्वाधिक जागा असल्याने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले. पण मागील काही दिवसांतील राजकीय भूकंपानंतर आघाडी सरकार कोसळलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केलं. भाजप आणि शिंदे गटाने सरकार स्थापन केल्यानंतर विरोधात असलेल्या महाविकास आघाडीत राष्ट्रवादी सर्वात मोठा विरोधी पक्ष बनला. राष्ट्रवादीची सदस्यसंख्या 53 तर काँग्रेसची 44 आणि शिवसेनेकडे 15 आमदार उरले. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरचे विरोधी पक्षनेते -

1. नारायण राणे - 22 ऑक्टोबर 1999 ते 19 ऑक्टोबर 2004 आणि 6 नोव्हेंबर 2004 ते 12 जुलै 2005

2. रामदास कदम - 1 ऑक्टोबर 2005 ते 3 नोव्हेंबर 2009

3. एकनाथ खडसे - 11 नोव्हेंबर 2009 ते 8 नोव्हेंबर 2014

4. एकनाथ शिंदे - 12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014

5. राधाकृष्ण विखे पाटील - 23 डिसेंबर 2014 ते 4 जून 2019

6. विजय वडेट्टीवार 24 जून 2019 ते 9 नोव्हेंबर 2019

7. देवेंद्र फडणवीस - 1 डिसेंबर 2019 ते जून 2022

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT