Anand Paranjpe News Sarkarnama
मुंबई

Kalyan-Dombivli News : भाजपा-शिंदे गटातील वादात राष्ट्रवादीची उडी; आनंद परांजपेंचा हल्लाबोल

शर्मिला वाळुंज

Anand Paranjpe News : कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा आणि शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपने असहकार्याचा आवाज उठविताच शिंदे गटाचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी युतीत वितुष्ट नको, असे म्हणत पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली. शिंदे यांच्या या डावानंतर आता भाजपातील वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मात्र, भाजप शिंदे गट या मित्र पक्षातील वादात आता राष्ट्रवादी (NCP) ने उडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते व कल्याण लोकसभेचे माजी खासदार आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी शिंदे यांना साईड अभिनेता असे संबोधत ते नाटक करत आहेत असे म्हणाले. त्यांचे काय होईल माहीत नाही. मात्र, महाविकास आघाडी ठाणे व पालघर जिल्ह्यात संपूर्ण ताकदीने लढेल असे देखील त्यांनी सांगितले.

कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपा आणि शिंदे गटातील वाद उफाळून आला आहे. भाजपा (BJP) कार्यकर्त्यांनी असहकार्याचा ठराव बैठकीत मांडला त्यानंतर एकच खळबळ उडाली. कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांसह कार्यकर्त्यांनी खासदार डॉ. शिंदे यांना लक्ष केले. कल्याण लोकसभा विजयात खासदार शिंदे यांना मंत्री रविंद्र चव्हाण यांचा मोठा हातभार लागलेला आहे.

शिवाय मनसेचा देखील भाजपाला उघड पाठिंबा असल्याने शिंदे यांनी सावध पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांनी माध्यमांना भाजपाच्या भूमिकेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. काही क्षुल्लक कारणांसाठी भाजपा शिवसेना युतीत मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतील नेत्यांकडून सुरू आहे. युतीत विघ्न निर्माण होत असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे असे शिंदे म्हणाले आहेत.

शिंदे यांच्यावर कल्याण लोकसभेचे माजी खासदार व राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. परांजपे म्हणाले, एक वर्षापासून जेव्हापासून शिंदे गटाचे सरकार आलेले आहे. ठाणे असो कल्याण, डोंबिवली असो सातत्याने शिंदे गट आणि भाजपामध्ये वाद चालूच आहेत. ठाण्यामध्ये भाजपाचा कार्यकर्ता प्रशांत जाधव याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रमोद चव्हाण असेल याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिव्यातील भाजपाचे रोहिदास मुंडे यांना त्रास दिला आणि त्यामुळे सातत्याने हा संघर्ष शिंदे गट विरुद्ध भाजपा हा चालूच आहे, असे आरोप परांजपे यांनी केले आहेत.

दरम्यान, खासदार शिंदे यांनी वक्तव्य केले ते मी गांभीर्याने घेत नाही. कारण ती अभ्यासपूर्ण नाहीत. राक्षसी म्हत्वाकांक्षेपोटी, सत्तेच्या लालसेपोटी आणि गद्दारीमुळे जे सरकार महाराष्ट्रात एक वर्षांपूर्वी आले ते राजीनामा देतील का? त्यांच्याकडे नैतिकता आहे का? त्यांच्याकडे निष्ठा आहे का? त्यांच्याकडे समर्पण आहे का? त्यामुळे ते राजीनामा अजिबात देणार नाहीत. त्यांना बोलायचे एक असते आणि नाटक करायचे असते. आपण एखाद्या चित्रपटामध्ये साईड अॅक्टर असतो ना तसे ते आहेत, ते अजिबात राजीनामा देणार नाहीत, अशी टीका परांजपे यांनी केली.

तसेच खासदार शिंदे यांच्या तोंडातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच नावे निघतात. 2014 व 2019 ला ते निवडून आले ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने. या तिघांचे आशिर्वाद त्यांच्या पाठी नव्हते का? ते त्यांना विसर पडला आहे, त्यांना फक्त भाजपाचे प्रेम सध्या दिसत आहे, असा टोला परांजपे यांनी लगावला. त्यांचे काय होईल माहीत नाही. मात्र, महाविकास आघाडी ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पूर्ण ताकदीने लढेल, असा इशारा परांजपे यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT