Rahul Narvekar Latest News, Jayant Patil Marathi News, Ramraje Naik Nimbalkar News
Rahul Narvekar Latest News, Jayant Patil Marathi News, Ramraje Naik Nimbalkar News Sarkarnama
मुंबई

जावयाचं कौतुक करून जयंतरावांनी सासऱ्यांसाठी लावली फिल्डींग

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची सभागृहात काही नेत्यांनी फिरकी घेतली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे नार्वेकरांचे सासरे आहेत. त्याचाच संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नार्वेकरांचं कौतुक करताना निंबाळकरांसाठीही फिल्डींग लावली. (Jayant Patil Latest Marathi News)

रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) हे विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यांचा सदस्यत्वाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने विधान परिषद सभापतींची निवड पुन्हा करावी लागणार आहे. रामराजे हे पुन्हा सदस्य म्हणून निवडून आले आहेत. तेच पुन्हा या शर्यतीत असणार आहेत. विधानसभेत भाजपकडे 164 संख्याबळ असल्याचे सिध्द झाले आहे. पण विधान परिषदेत विरोधक व सरकारकडील संख्याबळात फारशी तफावत नाही.

राज्यपाल नियुक्त सदस्यांवरच सभापती निवडीचं बरचसं गणित अवलंबून राहणार आहे. त्यामुळेच रविवारी विधानसभेत बोलताना जयंत पाटील यांनी राज्यपालांना खोचकपणे टोला लगावत आम्ही दिलेली बारा आमदारांची यादीच अंतिम करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे फडणवीसांनाही साकडं घातलं.

पाटील म्हणाले, जावई हे कुंडलीतलं दशम स्थान आहे. आपण आता आधुनिक काळात आहोत. ज्योतिषशास्त्र वगैरे ह्या सगळं बाजूला ठेवून आधुनिकता निर्माण करण्यासाठी कुंडलीतलं दशमस्थान ते कसं चुकीचं आणि खोटं आहे, हे दाखवण्याची संधी देवेंद्रजी आपल्याला आहे. खाली जावई आणि वर सासरे. या दोघांची किमान एक वर्ष अशी व्यवस्था ठेवायचं काम आपण करू शकता, असं पाटील यांनी सांगितलं.

हे फक्त कुंडली खोटी ठरवण्यासाठी. शेवटी या कुंडलीचा अभ्यास करणारे जे आहेत, जे अंधश्रध्दाळू आहेत, त्यांच्या विचारांना भेद देण्यासाठी एक वर्ष आपण वरच्या सभागृहात सासऱ्यांना संधी देऊयात. हे देशभर उदाहरण होईल. आपण एक वर्ष हा प्रयोग करू. मला खात्री आहे राज्यपालही नाही म्हणणार नाहीत, ते कधीच कुणावर अन्याय करत नाहीत, असं म्हणत पाटील यांनी बारा आमदारांच्या आघाडीने पाठवलेली नावांवर राज्यपालांनी शिक्कामोर्तब करण्यासाठी साकडं घातलं.

संध्याकाळी आपला समाचार घेण्याची व्यवस्था करू!

नार्वेकरांना उद्देशून बोलताना पाटील म्हणाले, सर्वांनी सांगितलंय, की आपण आमचे जावई आहात. त्यामुळे आमच्याकडे बघतानाचा आपला दृष्टीकोन चांगला असेल, याची मला खात्री आहे. तसं नसेल तर आमच्या मुलीला आम्ही घरी कळवू, आज काय काय झालं ते. संध्याकाळी आपला समाचार घेण्याची व्यवस्था आम्ही करू, अशी मिश्किल टिप्पणीही पाटील यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT