Supriya Sule latest News
Supriya Sule latest News  sarkarnama
मुंबई

नाती आणि सरकारं टिव्हीपेक्षा सोबत चर्चा करुन टिकतात : सुप्रिया सुळेंचा बंडखोरांना टोला

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : "जे सगळे आज पुढे येऊन बोलत आहेत ते आधी राष्ट्रवादीतच होते हे विसरुन चालणार नाही. आम्ही नात्यात कधी कटुता आणू दिली नाही. जरी पक्ष सोडून गेले तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमाच्याच भावना राहतील," अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना मांडली. तर नाती आणि सरकारं ही टिव्हीवर बोलण्यापेक्षा समोरासमोर चर्चा करुन टिकत असतात. त्यामुळे बंडखोर आमदारांनी चर्चा करावी, असा टोलाही त्यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे. (Supriya Sule latest Marathi News)

सुळे म्हणाल्या, नाती व सरकारे टेलिव्हिजनवर चालत नाही. बंडखोर आमदारांच्या ज्या काही मागण्या असतील त्या त्यांनी समोरासमोर येत मांडल्या पाहिजेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आपण घेतो तर संविधानाचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. त्यामुळे संविधानाच्या मार्गाने जायला नको का? छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेता मग समोरासमोर बसले पाहिजे ना जी काही मते असतील किंवा नसतील ती संविधानाने जगावी टेलिव्हिजनने नाही, असे खडेबोल सुळे यांनी बंडखोर आमदारांना सुनावले.

तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. नाती असतात, जबाबदार्‍या असतात. मतभेद असतीलही परंतु चर्चेतून मार्ग निघतो चर्चा तर झाली पाहिजे नाहीतर ती दडपशाही होते. एखादं मुल रुसलं म्हणा...चूकलं म्हणा परंतु आज उध्दव ठाकरे मोठा भाऊ म्हणून पोटात घेण्याची दानत दाखवत आहेत. मोठा भाऊ सगळं विसरुन पोटात घ्यायला तयार असेल तर याच्यापेक्षा काय हवं अजून असे सांगतानाच संविधानावर देश चालतो त्यामुळे चर्चा करा, असे आवाहनही सुळे यांनी केले. तर खासदार संजय राऊत यांना ईडीची नोटीस आली यावर बोलताना त्या म्हणाल्या की, हे दुर्दैवी आहे. ईडी ही पाच वर्षापूर्वी कुणाला माहीतही नव्हती . मात्र आज गावापर्यंतही ईडी माहीत झाली आहे, अशी खोचक टीका करत केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगाबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली.

दरम्यान, पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, आपल्या नेत्याच्या, वडीलांच्या आयुष्यात एखादा माणूस दोन मिनिटाचा आनंदाचा क्षण देऊन गेला असेल तर मी कधीही त्या व्यक्तीच्या विरोधात बोलणार नाही कारण माझ्या आईची व मला महाराष्ट्रातील संस्कृतीची जाणीव आहे. ज्या नात्यामध्ये कधीतरी एकत्र एका ताटात जेवलो असू त्या मिठाला जागायची सवय आहे असे सांगतानाच माझी स्वतःची संस्कृती हेच छत्रपतींनी मला शिकवले आहे. त्यामुळे वेदना एकाच गोष्टीची होते की जे लोक अनेक वर्ष राष्ट्रवादीत होते आम्ही त्यांचा मानसन्मानच केला व प्रेमाचं नातं ठेवले माझ्या मनात त्यांच्याविषयी कालही प्रेम होते आणि आजही आहे व उद्याही राहिल, असे मत सुळे यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT