जुई जाधव -
Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्र प्रकरण सुनावणीचे वेळापत्रक आता समोर आलं आहे. 6 जानेवारी ते 27 जानेवारीपर्यंत ही सुनावणीची प्रक्रिया चालणार आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यात आमदारांची उलटतपासणी घेण्यात येणार आहे. (Latest Marathi News)
राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांवर जितेंद्र आव्हाड यांनी सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. पक्षात बंडखोरी केल्यामुळे त्यांनी ही याचिका दाखल केली. विधानसभाध्यक्ष यांना लवकरात लवकर निर्णय म्हणजे 31 जानेवारीपर्यंत निर्णय घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार सलग ही सुनवाणी पार पडणार आहे.
शिवसेनेच्या सुनवाणीच्या वेळेला जी पद्धत वापरली गेली तशीच पद्धत राष्ट्रवादीच्या सुनावणीलादेखील वापरली जाऊ शकते. दोन्ही बाजूंच्या बाजू ऐकल्या जाणार आहेत आणि त्यानंतर निर्णय अध्यक्ष देणार आहेत. अजित पवार गटाने सत्तेत सहभागी होत, काही आमदारांसोबत शपथ घेतली, यामुळे पक्षात उभी फूट पडली. त्यावेळी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी ही याचिका दाखल केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आमदार अपात्र करण्याचा निर्णय हा सर्वस्वी विधानसभाध्यक्ष यांचा असतो आणि त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा, असे आदेश दिले आहेत.
6 जानेवारी - राष्ट्रवादीचे दोन्ही गटांमध्ये याचिका आणि त्यावरील उत्तराची कागदपत्रे एकमेकांना सोपविली जातील.
8 जानेवारी - याचिकेसाठी अधिकची, अतिरिक्त माहिती जोडण्यासाठी वेळ.
9 जानेवारी - फाईल्स किंवा अधिकची, अतिरिक्त कागदपत्रे पटलावर आणणे. मात्र, ९ तारखेनंतर ऐनवेळी कोणतीही नवी कागदपत्रे जोडता येणार नाही. अशा मागणीचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.
11 जानेवारी - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी. पहिल्या दिवशी शरद पवार गट अजित पवार गटाकडून सादर झालेली कागदपत्रे तपासेल.
12 जानेवारी - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणीचा दुसरा दिवस. अजित पवार गटाकडून शरद पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली जाईल.
14 जानेवारी - सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस.
16 जानेवारी - विधानसभाध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी. सुनावणीचे विषय नक्की केले जातील.
18 जानेवारी - प्रतिज्ञापत्र सादर करणे.
20 जानेवारी - अजित पवार गटाच्या साक्षीदारांची उलटतपासणी
23 जानेवारी - शरद पवार गटाच्या साक्षीदारांची उलटतपासणी
25 आणि 27 जानेवारी - राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तिवाद.
येत्या 10 जानेवारीला शिवसेनेच्या आमदारांचा निकालदेखील राहुल नार्वेकर देणार आहेत. त्यांचा जो निर्णय असणार आहे, तो निर्णय राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी महत्त्वाचा असणार आहे. शिवनेच्या आमदार अपात्र निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. शिवसेनेसाठी जो निर्णय लागू होईल, तोच निकाल राष्ट्रवादीसाठीदेखील लागू होण्याची शक्यता आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.