Rohit Pawar, Narendra Modi
Rohit Pawar, Narendra Modi Sarkarnama
मुंबई

पंतप्रधान मोदींसाठी रोहित पवार आले धावून

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (World Economic Forum) व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विशेष भाषण झाले. भाषणादरम्यान अचानक टेलिप्रॉम्प्टर (Teleprompter) बंद पडल्याने मोदींचा गोंधळ उडाल्याचा व्हि़डीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून काँग्रेसने पंतप्रधानांवर निशाणा साधला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) त्यांच्यासाठी धावून आले आहेत.

रोहित पवार यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. 'इकॉनॉमिक फोरम'च्या ऑनलाईन बैठकीत काल बोलत असताना Teleprompter बंद पडल्याने पंतप्रधानांच्या भाषणात अडथळा आल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय. अनेकजण याबाबत खिल्ली उडवतात. पण मला वाटतं अशी खिल्ली उडवणं चुकीचं आहे, असं पवार यांनी म्हटलं आहे.

एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठावर पंतप्रधान बोलत असताना ते देशाचे प्रतिनिधी म्हणून बोलत असतात. अशा वेळी Teleprompter चाच आधार घ्यावा लागतो. यावेळी चुकूनही एखादा शब्द चुकीचा गेल्यास ते देशासाठी परवडणारं नसतं. त्यामुळं या गोष्टीची चेष्टा करणं योग्य नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

काय घडलं नेमकं?

पंतप्रधान मोदी यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भाषणादरम्यान भारताच्या उल्लेखनीय कामांचा आढावा घेतला. भारतात गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अत्यंत उपयुक्त आहे. भारत हा संपूर्ण जगाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे. कोरोना काळात जगातील अनेक देशांना औषधे अन् लशींचा पुरवठा करत भारताने मोठी कामगिरी केल्याचे मोदींनी भाषणादरम्यान सांगितले. भारतीयांनी कोरोनाशी लढा कसा यशस्वी केला हेही मोदींनी सांगितले.

कोरोनाशी लढताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली असल्याचा उल्लेख केल्यानंतर लगेचच टेलिप्रॉम्प्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडला. त्यामुळे भाषण देत असतानाच मोदींना थांबावे लागले. काही सेकंद नेमकं काय घडलं, हे लक्षात आले नाही. त्यामुळे काहीशा गोंधळलेल्या स्थितीत आणि थोड्या संतापलेल्या नजरेने टेलिप्रॉम्प्टरकडे पाहू लागले. त्यांनंतर त्यांनी दोन्ही हात वर करत कानात हेडफोन लावेल आणि समोरच्यांना व्यवस्थित ऐकू येत आहे का, अशी विचारणा केली.

समोरून भाषण व्यवस्थित ऐकू येत असल्याचे सांगण्यात आले. पण त्यानंतर कदाचित काहीसा तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने आयोजकांनीही मोदींचे भाषण मध्येच थांबवत पुढील कार्यक्रमाला सुरूवात केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय मंचावर तांत्रिक बिघाडामुळे मध्येच भाषण थांबवावे लागल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.

काँग्रेसकडून पंतप्रधानांवर निशाणा

काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 'इतना झूठ Teleprompter भी नहीं झेल पाया' असं ट्विट केलं आहे. कोरोना काळातील मृतांचा आकडा केंद्र सरकारकडून लपवला जात असल्याची टीका राहुल गांधी यांच्याकडून केली जाते. त्यावरूनच त्यांनी हा निशाणा साधल्याची चर्चा आहे.

काँग्रेसनेही (Congress) पंतप्रधानांचा व्हिडीओ ट्विट करत 'अच्छा चलता हूं, दुआवों में याद रखना' आणि 'हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था' असं म्हणत पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. पंतप्रधान मोदी टेलिप्रॉम्प्टरशिवाय एक शब्दही बोलू शकत नाहीत, असं राहुल गांधी म्हणत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसते. सोशल मीडियात पंतप्रधान मोदी व राहुल गांधी यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT