Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest News Sarkarnama
मुंबई

'बंडखोर आमदारांना जेवणातून गुंगीचे औषध दिलं जातयं'

सरकारनामा ब्यूरो

Amol Mitkari : राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादीचे (NCP) विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि मंत्री एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) त्यांच्यासोबत बंड करून गेलेल्या बंडखोर आमदारांच्या जेवणातून गुंगीचे औषध दिले जातयं, असा खळबळजनक आरोप मिटकरी यांनी भाजपवर (BJP) केला आहे. (Amol Mitkari Latest News)

मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी निधी वाटपावरून लावलेले आरोप हे बिनबुडाचे असून यामध्ये काही तथ्य नाही. मात्र, शिंदेसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांसोबत काहीतरी चुकीचे घडत आहे. त्यांच्या जेवणातून त्यांना गुंगीचे औषध दिले जातं आहे. तसेच, एकनाथ शिंदे हे भाजप विरोधी आहेत. मात्र आज ते भाजपची प्रशंसा करत आहेत, नक्कीचं त्यांना भाजपकडून काहीतरी ट्रीट केलं जात आहे. या मागील कारण शोधणे गरजेचं असल्याचं मिटकरींनी म्हटलं आहे. भाजपवर मिटकरी यांनी केलेल्या या आरोपावर भाजपकडून कुठली प्रतिक्रिया येते हे पाहावे लागणार आहे.

आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या असून या नाराजी नाट्यांतराचा एकप्रकारे दुसरा अंकच सुरू झाल्याच दिसत आहे. शिंदे यांचे बंड तासागणिक नवनवी वळणे घेत आहे. दरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी शिंदे बंडखोर गटातील आमदारांना अपात्र करण्याची कार्यवाही आरंभिली आहे. मात्र, अपक्ष आमदार अग्रवाल आणि आमदार बालदी यांनी आज विधानसभा उपाध्यक्ष आणि विधानसभा सचिव यांना पत्र पाठवल्याने या परिस्थितीत उपाध्यक्षांना दुसऱ्या आमदारांना अपात्र ठरविण्याची कार्यवाही करण्याची संधी देऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, शिंदे गटाकडूनही उपाध्यक्षांवर अविश्‍वास आणण्यासाठी ३४ आमदारांच्या सहीचे पत्र २१ जून रोजीच विधानभवनात पाठविण्यात आले होते. त्यामुळे आता उपाध्यक्षांवरच अविश्‍वास आणावा, अशी मागणी शिंदे गटाने लावून धरली आहे.

दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला आणि थेट बंडखोरांना खडेबोल सुनावले. तर दुसरीकडे अदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना गद्दर संबोधत त्यांच्यावर टीका केली. आता हा बंड मोडून काढण्यासाठी ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरल्याने शिवसेना आता फ्रंन्टफुटवर येऊन खेळत असून बंडखोरांनी मुंबईत यावे, असे आव्हान देण्यात येत आहे. तर राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार हे पाचवर्षे टिकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. आता हे राजकीय नाट्य काय वळण घेते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT