Sunil Tatkare -Amol Kolhe Sarkarnama
मुंबई

Sunil Tatkare News : शपथविधीवेळी अमोल कोल्हे राजभवनात, नंतर त्यांनी...; खासदार तटकरेंचा गौप्यस्फोट

अनुराधा धावडे

Mumbai Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे समर्थक सुनील तटकरे यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली. राज्य घटनेतील दहाव्या परिशिष्टानुसार तटकरेंनी पक्षाच्या आदेशाच्या विरोधात वर्तन केल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

तर, पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या आरोप - प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व घडामोडींवर भाष्य केले.

कोल्हे यांच्यावर कारवाई का केली नाही ?

या वेळी तटकरेंनी डॉ.अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल विचारला असता तटकरे म्हणाले, ज्या दिवशी आम्ही राजभवनात शपथ घेतली, त्यावेळी अमोल कोल्हे आमच्या सोबत होते, पहिल्या दिवसांपासून त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्थन आहे. ते पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत आहेत; पण नंतर त्यांनी भूमिका बदलली, असेही सुनील तटकरेंनी(Sunil Tatkare) सांगितले.

आम्हाला न्याय मिळेल...?

तुम्ही दहाव्या परिशिष्टाचे उल्लंघन केले आहे असे तुम्हाला वाटत नाही का, असा सवाल विचारला असता, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय घेतला, निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला, तो सर्वांच्या समोर आहे, तो अदृश्य शक्तींच्या आधारे झालेला नाही. तो सर्व जगाच्या समोर आहे. त्या निर्णयाची पूर्ण खातरजमा करून आम्ही तो निर्णय घेतला आहे. त्या चौकटीतच आम्हीही निर्णय घेतल्यामुळे आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वासही तटकरेंनी व्यक्त केला.

काय आहे परिशिष्ट १० ?

राज्यघटनेच्या 52व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून दहाव्या परिशिष्टाचा समावेश करण्यात आला. यात कोणत्याही पक्षाचे आमदार किंवा खासदारांना कोणत्याही सभागृहातील इतर सदस्यांच्या याचिकेच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्ष किंवा लोकसभा अध्यक्ष पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार आमदार - खासदारांना अपात्र ठरवू शकतात.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT