Sharad Pawar- Narendra Modi Sarkarnama
मुंबई

Video Narendra Modi : पवारसाहेबांनी लिहिले पंतप्रधान मोदींना पत्र, थेट केली 'ही' मागणी..!

Chaitanya Machale

Mumbai News : ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी देशातील साखर उद्योगातील समस्यांबाबतची सविस्तर माहिती दिली असून साखर उद्योगाला 'अच्छे दिन' यावेत यासाठी काही निर्णय घ्यावेत, अशी विनंती मोदी यांना केली आहे.

देशात इथेनॉल बंदीचा प्रयोग फसल्यानंतर साखर उद्योग संकटात आला आहे. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. देशातील साखर उद्योगांचा आढावा घेत त्यातील समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्यासाठी तातडीने अनेक महत्वाचे निर्णय घेणे आवश्यक आहे, हे निर्णय घेतले जावेत, यासाठी हे पत्र मोदी यांना लिहिले आहे.केंद्र सरकारची साखर उद्योगांबाबत असलेली धोरणांमुळे साखर उद्योग अडचणींत आला आहे.

अतिरिक्त साखर साठ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने किमान 25 लाख टन साखर निर्यातीला मान्यता द्यावी, अशी मागणी शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. साखर कारखान्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करावं, कर्जफेडीचा विलंबावधी किमान दोन वर्षांचा दिला जावा. तसं झाल्यास कारखान्यांना त्यांनी बँकेकडून घेतलेले अल्प, मध्यम तसेच दिर्घ मुदतीचे कर्ज फेडता येतील, अशी मागणी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या पत्रावर पंतप्रधान मोदी काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.

शरद पवार यांचे बोट धरून आपण राजकारणात आलो असल्याने ते आपले गुरू आहे, असे भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काही वर्षांपूर्वी जाहीरपणे करत खळबळ उडून दिली होती. त्यानंतर शरद पवार यांनी देखील मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा आपल्या भाषणातून आपल्या स्टाईलमध्ये समाचार घेत त्यांना प्रत्युत्तर दिलं होते. यापूर्वी देखील विविध विषयांवर पवारसाहेबांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापूर्वी शरद पवार यांनी विविध विषयांवर पत्रे लिहून आपल्या म्हणणे मांडले आहे.यामध्ये अनेक महत्वाच्या विषयांवरील पत्रांचा समावेश आहे.

  • केंद्र मे २०२० मध्ये सरकारने आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) मुंबईहून गुजरातमधील गांधीनगर येथे हलवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी केंद्राचा निर्णय अत्यंत चुकीचा आणि अनुचित आहे. यामुळे मुंबईचे महत्व कमी होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी होईल, असे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हंटले होते.

  • ऑक्टोबर २०२० मध्ये कोविडची साथ होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून 'मंदिरं का उघडली जात नाहीयेत,' असा सवाल केला आहे. मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करताना 'तुम्ही हिंदुत्व सोडून सेक्युलर झालात?' असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला होता. यानंतर शरद पवार यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करणारं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं होतं. राज्यपालांनी त्यांच्या पत्रात वापरलेली भाषा ही त्यांच्या पदाला शोभणारी नसल्याचे या पत्रात म्हंटले होते.

  • डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी पवारांनी पत्र लिहिले होते. मोदी यांच्या मातोश्री हीराबेन यांनी नुकतीच वयाची शंभरी पूर्ण केली होती. मात्र, अचानक त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पवारांनी पत्र लिहित 'तुमचं तुमच्या आईवर किती प्रेम आहे आणि तुम्ही आईच्या किती जवळ आहात हे मला माहीत आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील या कठीण प्रसंगाची मला जाणीव आहे, असे या पत्रात लिहिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT