NCP Sarkarnama
मुंबई

NCP Politics : 'या' 15 जागांचा राष्ट्रवादीने घेतला आढावा, दावा पण करणार का ?

Sachin Deshpande

Loksabha Election 2024 :राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या दोन दिवसांपासून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणे सुरू केले आहे. राज्यात 45 पेक्षा अधिक जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकण्याचा जयघोष राष्ट्रवादी करत आहे. पण, त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील लोकसभेच्या 15 जागांचा आढावा घेतला आहे. आढावा घेतलेल्या जागांवर आता राष्ट्रवादी दावा करणार का ? असा प्रश्न यानिमित्त समोर आला आहे. राज्यातील महायुतीमध्ये सर्व सुरळीत नसल्याचे चित्र असून, राष्ट्रवादीने दबावतंत्राचा भाग म्हणून पंधरा जागांचा आढावा घेतल्याचा दावा केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आढावा घेतलेल्या लोकसभा जागांमध्ये भाजपच्या ताब्यातील पाच जागांचा, तर शिवसेना (शिंदे गट) च्या ताब्यातील चार जागांचा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही जागांचा आढावा घेण्यात आला आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे असलेल्या दोन जागांचा आढावा घेण्यात आला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आढावा बैठक मुंबईत पार पडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक आज पार पडली. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील विविध मतदारसंघांचा लोकसभानिहाय आढावा घेण्यात आला. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या चार जागा अर्थात यात तीन शरद पवार गटाच्या जागांवरदेखील राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार आहे. बारामतीची सुप्रिया सुळे ( शरद पवार गट), शिरुर मतदार संघात अमोल कोल्हे (शरद पवार गट), सातारा येथील श्रीनिवास पाटील (शरद पवार गट) या जागांचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. रायगड हक्काच्या जागेसह राष्ट्रवादी काँग्रेस इतर ठिकाणी पक्षाचे उमेदवार उभे करणार असल्याचे एकंदर चित्र राज्यात असून, ते विजयी करण्याचा मोठे शिवधनुष्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर राहणार आहे.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने आढावा घेतलेल्या जागांमध्ये पाच भाजपच्या लोकसभेच्या जागा आहे. यात केंद्रीय मंत्री डाॅ. भारती पवार यांच्या दिंडोरी, मनोज कोटक यांच्या ईशान्य मुंबई, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माढा, अहमदनगर येथील सुजय विखे आणि गडचिरोली येथील अनोक नेते या विद्यमान खासदार असलेल्या भाजपच्या जागांचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. इतक्यावरच पक्ष थांबला नाही तर त्यांनी शिवसेना (शिंदे गट) च्या नाशिक च्या हेमंत गोडसे, हिंगोली येथील हेमंत पाटील, कोल्हापूर येथील संजय मंडलिक, बुलढाणाच्या प्रतापराव जाधव यांच्या जागांचा आढावा घेतला. तर शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाच्या जागांचा आढावा घेत त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आता महायुतीत दावा करु शकते. यात परभणीच्या संजय जाधव, धाराशिव येथील ओमराजे निंबाळकर या दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करण्याच्या तयारीत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक, दिंडोरी, हिंगोली, ईशान्य मुंबई, धाराशिव, रायगड, कोल्हापूर, बुलढाणा, माढा, सातारा, शिरूर, बारामती, परभणी, अहमदनगर, गडचिरोली या पंधरा जागांचा आढावा घेत तयारी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या राज्यात 45 प्लसचे उद्दिष्ट पार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आढावा पार पडली. या लोकसभा मतदारसंघाच्या सद्यःस्थितीचा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. येणाऱ्या निवडणुकीत पक्षाचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या किती जागा निवडून येऊ शकतील, याची चर्चा करण्यात आली. आढावा घेण्यात आलेल्या जागांपैकी राष्ट्रवादी किती लोकसभा जागांवर दावा करते हे लवकरच निश्चित होईल.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT