Sharad Pawar News :  Sarkaernama
मुंबई

Sharad Pawar Meeting in Delhi : अजितदादांच्या बंडानंतर शरद पवार अँक्शन मोडमध्ये ; आज दिल्लीत संघटनात्मक पातळीवर..

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या बंडखोरीनंतर वेगवान घडामोडी घडत आहेत.अजित पवार व शरद पवार या दोन्ही गटांनी बुधवारी मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

अजित पवारांनी बंडखोरीनंतर लगेचच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन शिवसेना-भाजप सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव व पक्षचिन्हावर दावा सांगितला. त्यानंतर त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करून या राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव व घड्याळ या पक्षचिन्हाची मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर पक्षावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी शरद पवार अँक्शन मोडमध्ये आले आहेत. पवारांकडून पावले उचलण्यात सुरवात झाली आहे. त्याच अनुषंगाने दिल्लीत आज (गुरुवारी) राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पवार पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर काय बदल करतात, काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार आणि 8 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) चांगलेच सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

शरद पवार यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणावरुन पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल आणि खजिनदार खासदार सुनील तटकरे यांना बडतर्फ केले आहे. तसेच दिल्लीतील पक्षाच्या कार्यालयातून त्याचे फोटो हटवण्यात आले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत कोणता निर्णय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे एका पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्याच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावरही दावा सांगितला आहे. यासंबंधीचे 40 आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे एक पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केले आहे. त्यामुळे आता अजित पवारांनी संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावरच दावा केल्याचे स्पष्ट झाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या गटाने बुधवारी शरद पवारांची NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. तसेच अजित पवार पक्षाचे नवे अध्यक्ष असल्याचा प्रस्तावही पारित केला. प्रफुल्ल पटेल यांनी बोलावलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT