Nitin Gadkari, Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

NCP Vs BJP : "घरचा आहेर, कटू आहे पण...!''; नितीन गडकरींचा 'तो' व्हिडिओ अन् शरद पवार गटाच्या नेत्याचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

Jagdish Patil

Jitendra Awhad On Mahayuti Govt : लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

त्यामुळे आता राज्यातील राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तर यंदाच्या पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारने अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली. यामध्ये सर्वात चर्चेत आली ती 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.' (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)

याच योजनेवरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली, राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नसताना सरकार केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन या घोषणा करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सतत केला जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली.

महाराष्ट्रावर सध्या 7 लाख 80 हजार कोटींचं कर्ज असून यंदाचं 1 लाख 10 हजार कोटी, असं एकूण 8 लाख कोटीहून अधिक कर्ज राज्यावर असल्याचं पवारांनी सांगितलं. पवारांच्या या वक्तव्यानंतर त्यांचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे सरकारकडून राज्यात केल्या जाणाऱ्या विविध घोषणांवर टीका केली आहे.

महत्वाची बाब म्हणजे, राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी युतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओ ट्विट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "घरचा आहेर, कटू आहे पण सत्य आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन योजना लागू कारणे म्हणजे राज्याचे नुकसान करणे असे गडकरी साहेब म्हणता आहेत." या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हाड यांनी सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवर टीका केली.

गडकरी नेमकं काय म्हणाले?

आव्हाडांनी ट्विट केलेला नितीन गडकरींचा व्हिडीओ हा एएनआयला दिलेल्या मुलाखतीमधला थोडासा भाग आहे. या व्हिडिओत गडकरी हे सरकारी पैशातून वाटल्या जाणाऱ्या मोफत गोष्टींवर आक्षेप घेत आहेत. ते या मुलाखतीत बोलताना म्हणातात, "या देशातली वीज मंडळं 18 लाख कोटींच्या तोट्यात आहेत. जर देशातील सरकारांनी अशाच प्रकारे वीज मोफत देण्याची स्पर्धा केली, तर देशातलं वीज उत्पादन नष्ट होईल. फुकटच्या गोष्टी सरकारच्या पैशातून वाटल्यामुळे राजकारण होत नाही.

देशात आपण रोजगार निर्माण करायला पाहिजे. गरिबांना घरं बनवून द्यायला हवीत. देश कचरामुक्त करायला हवा. लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा. देशाच्या विकासासाठीचे असे शाश्वत उपाय करायला पाहिजेत. निवडणुका जिंकण्यासाठी फक्त रेवडी वाटल्यामुळे देशाचं नुकसान होईल, अर्थव्यवस्थेचं नुकसान होईल व समाजाचंही नुकसान होईल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT