Jayant Patil Sarkarnama
मुंबई

Jayant Patil News : महायुती सरकारविरोधात शरद पवार गट मैदानात उतरणार; जयंत पाटलांची मोठी घोषणा

Deepak Kulkarni

Mumbai News : राज्यात एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण पेटलं असतानाच दुसरीकडे अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेती आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेले आहे.हातातोंडाशी आलेली शेतपिकांची मोठी हानी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शुक्रवारी पावसाचा तडाखा बसला. आधीच दुष्काळ, कोसळलेले शेतीमालाचे दर यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी अवकाळी पावसाने पूर्णच कोलमडून गेला आहे.

याचवेळी सरकार काही मदत करत नसल्याचा आरोप करत विरोधकांनी वातावरण तापवलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सरकारविरोधात मोठी घोषणा केली आहे.

माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील दुष्काळ,अवकाळी पाऊस आणि सरकारची चुकीच्या धोरणांवर बोट ठेवत बळीराजाच्या मदतीसाठी रान उठवणार असल्याचे सांगितले. याच धर्तीवर शेतकऱ्यांचे विविध प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार असल्याची माहिती दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाद्वारे शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी ट्रॅक्टर रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे.जळगावला 30 नोव्हेंबर, अमरावतीला 1 डिसेंबर तर दिंडोरी येथे 5 डिसेंबरला मोर्चा निघणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाटील नेमकं काय म्हणाले...?

शेतकऱ्यांच्या विविध महत्त्वाच्या विषयांवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा शेतकरी आक्रोश मोर्चा असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. आधी दुष्काळाने होरपळलेला शेतकरी, अवकाळी पावसाने हैराण झाला आहे.

या पावसामुळे आलेली पिकेही वाया गेली. काही पिकांवर रोगराई पसरली आहे. जी पिके शिल्लक आहेत त्यांना बाजारभाव व्यवस्थित मिळत नाही. एकंदरच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातला शेतकरी हवालदिल झाला असल्याची भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

...तरीही मविआ सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं!

आमच्या महाविकास आघाडीच्या(Mahavikas Aaghadi) अडीच वर्षाच्या काळात कोरोनाचं संकट एवढं प्रचंड मोठं असताना देखील महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या बाजूनं उभी राहिली. शेतकऱ्यांना कधीही पैसे कमी पडून दिले नाहीत. प्रत्येक संकटं जेव्हा जेव्हा आली त्यावेळी शेतकऱ्यांच्या मागं सरकार उभं राहिलं आहे.हा त्यावेळेचा सगळ्यांचा अनुभव आहे.

सरकारतर्फे नुसत्या घोषणा होत आहेत व त्या घोषणांची अंमलबजावणी काही होत नाही. या सरकारची अडचण अशी आहे की, त्यांना काहीही सांगितले तर ते महाविकास आघाडीकडे बोट दाखवत असल्याची खोचक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT