NCP Sarkarnama
मुंबई

Thane NCP News : राष्ट्रवादीला ठाण्यात पुन्हा मोठा हादरा : पवारांच्या निकटवर्तीयाचा भाजपमध्ये प्रवेश

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) ठाणे (Thane) जिल्ह्यात लागलेली गळती काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. आताच हा धक्का मोठा मानला जात आहे. कारण राष्ट्रवादी सोडलेला हा नेता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. शिवाय, त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष हे राष्ट्रवादीचे मोठे पदही आहे. असे असूनही त्यांनी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश घेतला आहे. (NCP's State Vice President Dashrath Tivre joins BJP)

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता. शिंदे गटानंतर भाजपनेही ठाण्यात राष्ट्रवादीलाच टार्गेट केले आहे. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नाशिक येथे सुरू असलेल्या भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला आहे.

राज्यस्तरावरील पद उपभोगणारे तिवरे हे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जात होते. मात्र, त्यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाण्यात राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर हणमंत जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान, तिवरे हे कायम पवारांसोबत राहिले आहेत. त्यांची राजकीय इनिंग ही तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, ठाणे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, मुंबई बँकेचे संचालक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि आता महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशा चढत्या क्रमांकाची जबाबदारी राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. असे असूनही त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये उडी घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT