नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाब (Punjab) दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीवरून मोठा गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावर काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप-प्रत्यारोपांचा सामना सुरू आहे. यावरून आता बँडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) आमनेसामने आले असून, वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने सिद्धार्थच्या विरोधात कडक पावले उचलली आहेत.
पंजाबमध्ये मोदींच्या जिवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप भाजपने केला होता. यावर सायना नेहवालने ट्विट करीत या वादात उडी घेतली होती. तिने म्हटले होते की, देशात पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात तडजोड होत असेल तर तो देश सुरक्षित असू शकत नाही. पंतप्रधान मोदींवर अराजकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करते. देशाचे पंतप्रधानचं सुरक्षित नसतील तर आपण देश सुरक्षित असल्याचा दावाच करु शकत नाही.
यावर अभिनेता सिद्धार्थने ट्विट करीत सायनाला लक्ष्य केले होते. या ट्विटमधील भाषा वादग्रस्त ठरली आहे. यावर सिद्धार्थने खुलासाही केला आहे. असे असले तरी या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने तातडीने पावले उचलली आहेत. आयोगाने सिद्धार्थचे हे ट्विट ब्लॉक करण्याची मागणी ट्विटरकडे केली आहे. याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. परंतु, हा सिद्धार्थ हा चेन्नईचा रहिवासी तर सायना ही हैदराबादची रहिवासी आहे. असे असतानाही आयोगाने महाराष्ट्र पोलिसांना कारवाईचे निर्देश दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
फिरोझपूरमध्ये पंतप्रधानांकडून 5 डिसेंबरला विविध प्रकल्पांचे उदघाटन केले जाणार होते. दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम नियोजित होता. त्यासाठी भाजपने जय्यत तयारीही केली होती. त्याआधी पंतप्रधान मोदी हुसेनवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारक येथे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण पावसाळी वातावरणामुळे त्यांनी रस्त्याने जाण्याचा निर्णय़ घेतला. भटिंडा येथून हा मार्ग दोन तासांचा होता.
पंजाब पोलिस महासंचालकांनी सुरक्षा व्यवस्थेची खात्री केल्यानंतर पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा हुसेनवालाच्या दिशेने निघाला होता. हुतात्मा स्मारकापासून 30 किलोमीटर अंतरावरील एका पुलावर वाहनांचा ताफा आल्यानंतर काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे लक्षात आले. त्यामुळे पंतप्रधानांना सुमारे 20 मिनिटे तिथेच थांबावे लागेल. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही मोठी त्रुटी होती, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले होते.
पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक आणि प्रवासाचे नियोजन पंजाब सरकारला आधीच कळवले होते. त्यानुसार राज्य सरकारने सुरक्षा व इतर बाबींची योग्य खबरदारी घेणे आवश्यक होते. सरकारने रस्त्यावरील इतर गोष्टी थांबवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरवणे अपेक्षित होते. पण तसे करण्यात आले नाही. सुरक्षा व्यवस्थेतील या त्रुटींमुळे पंतप्रधानांनी पुन्हा भटिंडा विमानतळाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.