Mumbai News: संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्यावरुन आता चांगलंच राजकारण तापलं आहे. सातारा झेडपीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या राड्याचे तीव्र पडसाद सोमवारी(ता.23) विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले. विधान परिषदेत या प्रकरणावरून सभागृहात सत्ताधारी पक्षांमध्येच जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.त्यात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले. आता हाच निर्णय वादात सापडला आहे.
भाजपनं कडाडून विरोध केल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेला सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेशावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून गोऱ्हे यांना एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याच्या निलंबनाचा अधिकार असतो का..? असा सवाल उपस्थित करत शिवसेनेकडून थेट सभापतींना पत्र लिहिण्यात आलं आहे.
या पत्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत त्यांना विधानपरिषदेच्या उपसभापती या पदावरून दूर करा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. त्याचदरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मंगळवारी (ता.24) विधान परिषदेत प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.
राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी अधिवेशनात सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या कथित धक्काबुक्की आणि पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी यावेळी सातारा पोलिसांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान पक्षपाती भूमिका घेतल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान आम्हाला पोलिसांकडून रोखण्यात आले. शंभरहून अधिक पोलिसांनी आमच्याशी धक्काबुक्की केली. आम्ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी असताना अशी वागणूक देणे योग्य आहे का? पोलीस अधीक्षक हे प्रशासनिक अधिकारी नसून एखाद्या घरगड्यासारखे वागत होते. या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणीही देसाई यांनी केली आहे.
यानंतर तापलेल्या वातावरणातच उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळाची गंभीर दखल घेत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले. तसेच घटनेशी संबंधित 100 पोलिसांवरही निलंबनाच्या कारवाईचे निर्देश गोऱ्हे यांनी दिले आहेत. या उपसभापतींच्या निर्णयानंतर सभागृहात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या कारवाईवर भाजपकडून आक्षेप नोंदवण्यात आला.
यावर कायदे अभ्यासक असीम सरोदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या निर्णयावर भाष्य केलं. सरोदे म्हणाले, 'नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि इतर शंभर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहायला गेले तर नीलम गोऱ्हे यांना पोलिसांना थेट निलंबित करण्याचे कोणतीही अधिकार नाहीत.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.