BJP-Shivsena-Congress
BJP-Shivsena-Congress Sarkarnama
मुंबई

भाजपच्या गडांची मोडतोड करता करता शिवसेनेचा मित्रपक्ष काँग्रेसलाही 'शॉक'!

सरकारनामा ब्यूरो

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेत प्रारुप प्रभाग रचना आराखड्यामुळे भाजपमधील (bjp) प्रस्थापितांचे प्रभागच इतर प्रभागांत विलिन झाल्याने मोठा धक्का बसला आहे. डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला असून, येथे संघाचेही प्राबल्य आहे. हक्काचे प्रभागच विभागले गेल्याने भाजपच्या गोटात चलबिचल सुरू झाली आहे. शिवसेनेने (shivsena)आपल्या सोयीनुसार प्रभाग रचना करून घेतल्याचा आरोप करून या प्रभाग रचनेविरोधात हरकती सूचना भाजप नोंदविणार आहे. (New ward structure shock to established BJP leaders in Dombivali)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचे एकहाती वर्चस्व असल्याचे शिवसेनेकडून दाखवून दिले जात असले तरी काही निवडणुकांमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी शिवसेनेला भाजप आणि अपक्षांची मदत घ्यावी लागली होती. डोंबिवलीत वर्चस्व असलेल्या हक्काच्या जागा निवडून आणण्यासाठी भाजपने कंबर कसली होती. मात्र नव्या प्रभाग रचनेनुसार भाजप नगरसेवकांचे प्रभाग शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा दोन शिवसेनेचे उमेदवार असलेल्या प्रभागांना जोडण्यात आले आहेत, त्यामुळे प्रत्येक प्रभागात भाजपच्या विद्यमान नगरसेवकांची कोंडी झाली आहे.

डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र चव्हाण स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागातून पालिकेत पहिल्यांदा निवडून आले होते. संघ विचारसणीचा प्रभाव असलेला हा मतदारसंघ असून येथे पहिल्यापासून आमदार चव्हाण यांचे वर्चस्व राहिले आहे. हा प्रभाग वगळून तो सारस्वत कॉलनी, पेंडसेनगरमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यासोबतच डोंबिवलीतील भाजपचे प्रमुख दावेदार असणारे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांचा विष्णूनगर हा प्रभाग बावनचाळ, भागशाळा मैदान यांना जोडण्यात आला आहे. या दोन्ही भागात शिवसेनेचे वर्चस्व आहे.

हेतुपुरस्पर शिवसेनेला फायदेशीर अशाच पद्धतीने या प्रभागांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. कॉंग्रेस व इतर पक्षातील नगरसेवकांनीही याचा विचार करावा. ज्या भागात कॉंग्रेसचे नगरसेवक निवडून येतील, ते प्रभागही दुसऱ्या प्रभागांत विलीन करण्याचे काम केले गेले आहे. यावर आता हरकती सूचना नोंदविल्या जातील, असे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकसंख्या वाढूनही शिवसेनाला अनुकूल नसल्याने प्रभागात वाढ नाही

पलावा, अनंतम, रुणवाल, रिजन्सी, लोढा, मानपाडा, कोळेगाव, हेडुसण, निळजे आदी भागात नागरिकरण वाढले आहे. याठिकाणी प्रभागांची रचना वाढवण्यात आलेली नाही. तसेच खंबाळपाडा, कांचनगाव, 90 फिट रोड येथे वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे दोन प्रभाग होणे गरजेचे होते. तिथे एकच करण्यात आला आहे. आडिवली, ढोकळी, दावडी, गोळवली, सोनारपाडा येथे लोकवस्ती वाढली. पण ,नगरसेवक वाढले नाहीत. नगरसेवक कोणत्याही पक्षाचे असले तरी ते शिवसेनेला फायदेशीर नसल्याने याठिकाणी प्रभागांची रचना कमी करत तीनवर करण्यात आली असल्याचा आरोप या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी केला.

काँग्रेसने साधला शिवसेनेवर निशाणा

प्रभाग रचना ही अगोदरच काही पक्षाच्या नेत्यांना माहिती होती, त्यांनी तशापद्धतीने काम करण्यास सुरुवातदेखील केली आहे. याचा अर्थ अधिकारी आणि काही पदाधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे, हे उघड होते, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेश नेते संतोष केणे यांनी शिवसेनेचे नाव घेता केली. सोयीनुसार त्यांनी काही प्रभागांत बदल केले आहेत. 18 गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्यात आली असून त्याचा जीआरदेखील आला आहे. असे असतानाही येत्या निवडणुकीत महापालिकेने पूर्ण 27 गावांचा प्रभाग रचनेत समावेश केला आहे. या गावांचा निर्णय झाल्यास पुन्हा नव्याने पालिकेला प्रभाग रचना करावी लागेल, हे निश्चित. मागील वर्षीही प्रभाग रचनेत बदल केल्याने कॉंग्रेस पक्षाला त्याचा मोठा फटका बसला होता. येत्या निवडणुकीत वरिष्ठ जो निर्णय घेतील, त्यानुसार निवडणुकांची तयारी केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT