New MLC  Sarkarnama
मुंबई

MLC Oath Ceremony : भावना गवळींचे जय एकनाथ..., तर सदाभाऊंचे जय जवान जय किसान...; अकरा जणांना आमदारकीची शपथ

Vijaykumar Dudhale

Mumbai, 28 July : विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेले अकरा आमदारांना आज शपथ देण्यात आली. यात महायुतीच्या नऊ, तर महाविकास आघाडीच्या दोन आमदारांचा समावेश आहे.

शपथ घेतल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित आमदार भावना गवळी यांनी जय एकनाथ अशी, तर सदाभाऊ खोत यांनी जय जवान-जय किसान ही घोषणा दिली, तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांनी सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंना वंदन करत शेवटी ठाकरे कुटुंबीयांचे आभार मानले. भावना गवळी यांनी दिलेल्या ‘जय एकनाथ’ची चर्चा विधीमंडळ परिसरात रंगली आहे.

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित आमदारांना (MLC) आज शपथ दिली. त्यात पहिल्यांदा माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शपथ घेतली. त्यानंतर रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत, भाजपचे परिणय फुके, शिवसेना शिंदे गटाच्या माजी खासदार भावना गवळी, माजी खासदार कृपाल तुमाने यांनी शपथ घेतली.

शिवसेनेच्या दोन आमदारांनंतर भाजपचे योगेश टिळेकर, काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे, भाजपचे युवा आमदार अमित गोरखे, शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेवटी राजेश विटेकर यांनी शपथ घेतली.

दोन नंबरला शपथ घेतलेल्या आमदार सदाभाऊ खोत यांनी शेवटी जय जवान-जय किसानचा जयघोष केला. माजी खासदार (स्व.) राजू सातव यांचे स्मरण करत डॉ. प्रज्ञा सातव यांनी शपथ घेतली. मिलिंद नार्वेकर यांनी बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून शपथ घेतली. शेवटी उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांचे आभार मानले.

अमित गोरखे यांनी शेवटी जय लहुजी, जय भीम आणि जय संविधान असा नारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रातील सर्व संत आणि विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतो, असे शपथ घेतल्यानंतर स्पष्ट केले. या सर्वांमध्ये भावना गवळी यांनी केलेला जयघोष विशेष लक्षवेधी ठरला.

विधान परिषदेच्या एकूण 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यानंतर झालेल्या मतदानात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये काहीसे अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते. कारण, काँग्रेसकडील अतिरिक्त मतांचे तसेच, दोन नंबरच्या मताचे योग्य पद्धतीने वाटप झाले नव्हते, असा आरोप केला होता

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT