Nitesh Rane & Nawab Malik.
Nitesh Rane & Nawab Malik. 
मुंबई

नवाब मलिकांच्या भाजपवरील आरोपांवरून राणेंचं वादग्रस्त विधान

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कॉर्डिलिया क्रूझ (Cordelia cruise) ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी या प्रकरणाशी थेट भाजपचे कनेक्शन जोडले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मलिक यांनी दोनवेळा पत्रकार परिषद घेत भाजप व अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागावर (NCB) थेट आरोप केले आहेत. आता या प्रकरणात आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही उडी घेतली आहे.

नितेश राणे यांनी नबाव मलिक यांच्या आरोपानंतर या प्रकरणाला धार्मिक रंग दिला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. 'नवाब मलिक आत्ताच का एवढे बोलत आहेत. कारण तो खान आहे सुशांतसिंग राजपूत नाही. केवळ त्याचं नाव खान असल्यानं तो पिडीत ठरतो आणि सुशांतसिंग हिंदू होता म्हणून व्यसनाधीन,' असं राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यनला अटक केली आहे. सध्या तो एनसीबीच्या कोठडीत आहे. यावरून नवाब मलिक यांनी थेट एनसीबीलाच आरोपीच्या कठड्यात उभे केले आहे. त्यावरून भाजप नेत्यांनी मलिक यांच्यावर पलटवार केला आहे. तर नितेश राणे यांनी या प्रकरणाला धार्मिक रंग दिल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यांनी थेट सुशांतसिंगच्या आत्महत्येशी या प्रकरणाची तुलना करत मलिकांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शनिवारी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर हल्लाबोल केला. ड्रग्ज प्रकरणातील रिषभ सचदेवा (Rishabh Sachdeva), प्रतिक गाभा (Pratik Gabha),अमीर फर्निचरवाला (Amir Furniturewala) यांना एनसीबीने अटक का केली नाही, एनसीबीने त्यांना का सोडलं. या तीन जणांचे मोबाईल जप्त का केले नाही,' याचा खुलासा वानखेडे यांनी करावा,'' असे मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

''या प्रकरणातील आरोपीच्या चैाकशीसाठी समिती नेमण्यात यावी,'' अशी मागणी मलिक यांनी आज केली होती. मलिक म्हणाले की, रिषभ सचदेवा हे मोहित भारतीय यांचे भाचे आहेत. या तिघांना सोडण्यासाठी एनसीबीला कोणी फोन केला, याचा खुलासा झाला पाहिजे. समीर वानखेडे यांचे कॉल डिटेल्स मुंबई पोलिसांनी तपासावे. एनसीबीची कारवाई 'फर्जीवाडा' आहे.'

''ही मोठ्या घरातील मुले आहेत. त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले. ते एकमेंकांचे मित्र आहे. या सगळ्या कटात भाजपचे नेते सहभागी असल्याने त्यांच्या नातेवाईकांना सोडण्यात आले. ज्यांनी आर्यन खानला बोलावले त्यांना का सोडण्यात आले, असा सवाल मलिक यांनी यावेळी उपस्थित केले. माझं काम सत्य समोर आणणं हे आहे. फरार आरोपी के.पी. गोसावी हा या प्रकरणात पंच कसा झाला, असा प्रश्न मलिक यांनी विचारला. ''या प्रकरणात तेराशे जणांची चैाकशी केली . यातील ११ जणांची माहिती मुंबई पोलिसांनी देण्यात आली, त्यातील तीन जणांना सोडण्यात आले. त्यांना सोडण्यासाठी भाजपच्या कोणत्या नेत्याने एनसीबीला फोन केला याचा खुलासा करावा,'' अशी मागणी मलिकांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT