नवी दिल्ली : कोकणाला विमानसेवेने जगाला जोडणाऱ्या चिपी विमानतळाचे शनिवारी दिमाखात उद्घाटन करण्यात आले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या विमानतळाची दखल घेतली. विमानतळामुळे हवाई जोडणी आणि पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल', अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. त्यानंतर लगेचच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान मोदींना कोकणला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही दिली आहे.
बहुचर्चित चिपी विमानतळाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी पार पडले. ज्योतिरादित्य शिंदे हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी झेंडा दाखवून विमानतळाचे उद्घाटन केले. याबाबतचे ट्विट त्यांनी केले होते. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी हे ट्विट शेअर करत कोकणवासियांना शुभेच्छा दिल्या.
'कोकणवासियांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. चिपी विमानतळामुळे हवाई जोडणी आणि पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल', अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर लगेचच शिंदे यांनी ट्विटरवरच सांगितले की, 'नक्कीच मोदीजी. कोकण विभागासाठी भविष्यात यापेक्षाही चांगली हवाई जोडणी देण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.' शिंदे यांच्या या विधानामुळे कोकणवासियांच्या अपेक्षा आता उंचावल्या आहेत.
ज्योतिरादित्य शिंदेचं मराठीतून भाषण
ज्योतिरादित्य शिंदे यांनी कार्यक्रमादरम्यान संपूर्ण भाषण मराठीतून केले. ते म्हणाले, कोकण हा एक निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. तसेच सिंधुदुर्गही आहे. हे ठिकाण जेवढं सुंदर आहे तेवढीच येथील शेतीही महत्वाची आहे. इथल्या मातीमध्ये निसर्गाने खुप फळं, धान्याचा ठेवा दिला आहे. जसे फळांचा राजा, कोकम, भात शेती होते. फणस, सुपारी, मसाले होतात. मासळीचा व्यवसाय आहे. या सगळ्या व्यापारीक वस्तु आहेत.
नागरी उड्डाण मंत्रालयाच्या नकाशावर आता ही जागा आम्ही आणली आहे. आता या जागेला प्रसिध्द करायचे आहे. इथला व्यापार वाढवायचा आहे. ज्यामुळे शेतपिकांना किंमत मिळेल. हे स्थान गोव्याच्या जवळ आहे. जसं गोवा जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे तसंच कोकणला करायचे आहे, असं शिंदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.