Nitin Desai, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Nitin Desai To Eknath Shinde : नितीन देसाईंची 'ऑडिओ क्लिप' आली समोर; राज्य सरकारला केले 'हे' आवाहन

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पुर्वी त्यांनी रेकॉर्ड केलेल्या काही 'ऑडिओ क्लिप' समोर आल्या आहेत. या क्लिप्स त्यांनी परिवारातील सदस्य, मित्र आणि वकिलांना पाठवल्या होत्या.

यातून त्यांनी राज्य सरकारला एनडी स्टुडिओबाबत भावनिक आवाहन केल्याचे समोर आले आहे. सरकारने हा स्टुडिओ ताब्यात घ्यावा, अशी विनंती पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देसाई यांनी केली आहे. देसाई यांच्या सूचनेनुसार त्यांच्या सहायकाने संबंधित 'ऑडिओ क्लिप' त्यांच्या वकिलाला पाठविल्याची माहिती आहे. (Latest Political News)

नितीन देसाई यांच्यावर कोट्यवधींचे कर्ज होते. कर्ज देणाऱ्या काही कंपन्यांनी फसवणूक आणि छळ केल्याचेही देसाई यांनी 'रेकॉर्डिंग'द्वारे सांगितले आहे. देसाई म्हणाले, "एनडी स्टुडिओ फक्त स्टुडिओ नाही, ते एका मराठी माणसाने उभे केलेले स्वप्न आहे. त्यामुळे या स्टुडिओचा ताबा कर्ज देणाऱ्या कुठल्याही कंपनीला किंवा बँकेकडे जाऊ देऊ नये. मराठी माणसाने उभारलेल्या म्हणून राज्य सरकारने हा स्टुडिओ ताब्यात घ्यावा. मराठी कलाकारांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी या स्टुडिओचा सरकारने उपयोग करावा."

नितीन देसाईंच्या मृत्यूमुळे पोरका झाल्याची भावना खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले,"ज्या राजा शिवछत्रपती मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, त्या मालिकेचे निर्माते नितीन देसाई होते. कलाक्षेत्रातील आजवरच्या प्रवासात मला लाभलेले नितीनदादांचे मार्गदर्शन आणि त्यांची साथ खूप मोलाची ठरली आहे. नितीन देसाईंच्या निधनाची बातमी माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे."

दरम्यान, मे महिन्यात एका जाहिरात संस्थेने त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. त्या जाहिरात संस्थेने देसाईंवर ५१.७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. तीन महिने काम करूनही देसाईंनी पैसे दिले नाहीत, असा तो आरोप होता. नितीन देसाईंनी मात्र हे आरोप फेटाळून लावले होते. यापूर्वीही एजन्सीने आपल्यावर असेच आरोप केल्याचा पलटवारही त्यांनी केला होता.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT