Ravi Rana| Navneet Rana
Ravi Rana| Navneet Rana Sarkarnama
मुंबई

नवनीत राणांच्या आरोपांविषयी आणखी एक सत्य समोर; न्यायालयात सांगितलं होतं...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आपण मागासवर्गीय असल्याने खार पोलीस ठाण्यात आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही, अशी गंभीर तक्रार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी एका पत्राद्वारे लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. या आरोपांबाबत आता नवनवीन माहिती समोर येत आहे. मुंबई पोलीस आयुक्तांकडून पोलीस ठाण्यातील चहा पितानाचा व्हिडीओ, राणांच्या वकिलांनी नंतर केलेला खुलासा अन् आता राणांनीच न्यायालयात दिलेली माहिती यावरून आता या प्रकरणात पुन्हा ट्विस्ट आला आहे.

लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला (Omprakash Birla) यांना राणांनी पत्र लिहिलं आहे. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी मंगळवारी राणा दाम्पत्याचा पोलीस ठाण्यात चहा पितानाचा व्हिडीओ ट्विट केला. पण काही तासांतच राणांचे वकील रिझवान मर्चंट यांनी राणांना दिलेली वागणूक सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील असल्याचा दावा केला आहे. मर्चंट यांच्या या दाव्यामुळे प्रकरणाला पुन्हा एका वेगळं वळण लागलं आहे.

आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. 'एबीपी माझा'च्या वृत्तानुसार, 'नवनीत राणा यांनी न्यायालयात पोलिसांबाबत काहीही तक्रार नसल्याचे सांगितले होते. न्यायालयाकडून त्यांना पोलिसांविषयी तक्रार आहे का, असं विचारण्यात आलं होतं. पण त्यांनी नाही असं उत्तर दिलं होतं.' त्यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. कोठडीतून मग त्यांनी वकिलांमार्फत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहितं गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला पुन्हा वेगळं वळण मिळालं आहे.

दरम्यान, राणा यांच्या पत्रामध्ये स्पष्टपणे खार पोलीस ठाण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर पांडे यांनीही त्यांच्या दाव्यानुसार खार पोलीस ठाण्यातील व्हिडीओ ट्विट केला. पण मर्चंट यांनी पांडे यांच्या व्हिडीओवरून प्रतिक्रिया देताना त्यांच्यावर पलटवार केला आहे. मर्चंट यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केला आहे. मर्चंट यांनी सांगितलं की, नवनीत राणा यांनी केलेले आरोप हे सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील आहेत. त्यांना खार पोलीस ठाण्यात चहा देण्यात आला, हे खरं आहे. त्याचाच व्हिडीओ पांडे यांनी ट्विट केला आहे. पण राणांना मध्यरात्री एक वाजता सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हलवण्यात आलं. तिथंच त्यांना अशी वागणूक देण्यात आली, असं मर्चंट यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात ट्विस्ट आला असून आता संजय पांडे याला कसं उत्तर देणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

संजय पांडे यांनी मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक व्हिडीओ ट्विट करत राणा यांचे आरोप खोटे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ खार पोलीस ठाण्यात असल्याचे सांगितले जात आहे. 'आम्हाला आणखी काय बोलण्याची गरज आहे का,' असंही पांडे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. पांडे यांनी यापेक्षा काहीही न लिहिता व्हिडीओतून पोलीसांनी कोणतीही चूक केली नसल्याचेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. थेट संजय पांडे यांनीच हा व्हिडीओ ट्विट केल्याने त्याला महत्व प्राप्त झाले. पांडे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये राणा दाम्पत्य अत्यंत शांत वातावरणामध्ये चहा पित असल्याचे दिसत आहे.

मुंबई पोलिस जातीयवादी असल्याचा आरोप राणा यांनी केला होता. त्याची लेखी तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. त्यातून त्यांचा 'दलित कार्ड'चा प्लॅन होता. मात्र, तो प्लॅन मुंबई पोलिस आयुक्तांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमुळे फेल झाला असल्याचे सांगितले जात आहे. नवनीत राणा यांचा पोलिसांविरोधात अँट्रासिटी केस दाखल करण्याचाही हेतू होता. मात्र, तक्रार नोंदवनारे आणि तक्रार नोंदवून घेणारे अधिकारी एकाच प्रवर्गातील आहेत. राणा यांच्या तक्रारीत खार पोलीस ठाण्यात चुकीच्या वागणुकीचा उल्लेख आहे. मात्र, त्यांना मध्य रात्री सांताक्रुझ पोलीस ठाण्यात हलवण्यात आले होते. पोलिसांवर केलेल्या आरोपांमुळे आता राणाच अडचणीत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT