Hindu-muslim Politics| Nitesh Rane|
Hindu-muslim Politics| Nitesh Rane|  
मुंबई

आता हिंदूंना टार्गेट केलं तर जशास तसे उत्तर देऊ; नितेश राणेंचा इशारा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरात प्रतिक पवार या युवकावर गुरुवारी (४ ऑगस्ट) रात्री एका गटाने हल्ला केला होता. या प्रकरणावर आता भाजप (BJP) आमदार नितेश राणे यांनी हल्लेखोरांना थेट इशाराच दिला आहे. तर जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मात्र, प्रतिकने काही दिवसांपूर्वी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे त्याच्यावर हा हल्ला झाल्याचा आरोप हिंदुत्वावादी (Hindutva) संघटनांकडून केला जात आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रतिकवर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नुपूर शर्मा यांना समर्थन दिल्याने राजस्थानातील उदयपूरमध्ये एका हिंदूची हत्या करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रातील अमरावतीमध्येही एका हिंदूची हत्या करण्यात आली. शर्मा प्रकरण संपलेले असताना आता पुन्हा अहमदनगरमधील एका युवकावर हल्ला करण्यात आला. प्रतिक पवार असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणावर आमचे बारीक लक्ष आहे पण एकच सांगतो आता जर हिंदूंना टार्गेट केलं तर आम्ही जशास तसे उत्तर देण्यासाठी तयार आहोत, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ४ ऑगस्टला प्रतिक पवार नावाच्या युवकाला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला जात असताना १०-१५ मुस्लिम तरुणांनी थांबवलं. नुपूर शर्माला समर्थन करतो म्हणून त्याच्यावर या लोकांनी हल्ला केला. तलवारी-कोयत्यांनी वार केले, त्यांना वाटलं तो मेला. म्हणून ते पळून गेले. पण त्याचवेळी त्यांच्या काही मित्रांनी त्याला पाहिलं आणि त्याला रुग्णालयात दाखल केले, आज तो मृत्यूंशी झुंज देत आहे. अमरावतीतील घटनेप्रमाणे प्रतिक पवार या घटनेचीही चौकशी एनआयए ने करावी, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.

भारत हा संविधानावर चालणारा देश आहे. या पुर्वी महाराष्ट्रात असे मारुन टाकण्याचे प्रकार होत नव्हते. शर्मा विषय बंद झालाय, पण हिंदूना मारुन टाकण्यापर्यंत तुमची मजल जात असेल तर आमचेही हात बांधलेले नाही. आता जर तुम्ही हिंदूना टार्गेट केलं तर आम्ही जशास तसे उत्तर देणार, असा निर्वाणीचा इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला. आमच्या देशात शरिया कायदा लागू नाही, तुमच्या देव देवतांवर बोलल्यास विसरायला तयार नसाल तर, आमच्या देवीदेवतांच्या विटंबना होत आहेत. शिवलिंगाबाबत तुम्ही घाणेरडे प्रकार करत असाल तर आता हिंदूनाही तिसरा डोळा उघडावा लागेल. आमच्या लोकांच्या रक्षणासाठी आम्ही तयार आहोत, असही राणेंनी म्हटलं आहे.

घटनेनंतर या प्रकरणावर गुन्हा दाखल झाला. पण मुख्य आरोपी फरार आहे. पोलिस अधिकारी हिंदुच्या घरी जाऊन केस दाबण्याचा प्रयत्न करत होते. पण अनेक हिंदू संघटना एकत्र आल्यानंतर गुन्हा दाखल झाला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या प्रकरणाकडे बारीक लक्ष आहे. आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आमच्या लोकांना हात लावण्याची हिंमत करु नये, आमच्या देशात शरिया कायदा लागू करायचा प्रयत्न करु नका. आम्ही कोणच्याही धर्माच्या, देवांच्या विरुद्ध नाही. पण देशाच्या रक्षणासाठी या गोष्टी करु शकतो. तुम्ही प्रवृत्त करु शकत असाल तर आम्ही तयार आहोत. असेही राणेंनी स्पष्ट केलं आहे.

आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार नाही की नवाब मलिक अल्पसंख्यांक मंत्री नाहीत. आता महाराष्ट्रात हिंदूत्त्वावादी विचारांच सरकार आहे. हा विचार मजबूत झाला पाहिजे यासाठी १६६ आमदार एकत्र आले आहेत. हिंदुत्व महत्वाचं आहे आणि त्यासाठी सर्व गोष्टी माफ आहेत, असं सूचक वक्तव्यही राणेंनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT