Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

आता लढाई मुंबईच्या स्वातंत्र्याची : फडणवीसांनी फुंकले पालिका निवडणुकीचे रणशिंग

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही मुंबई शिवसेनेच्या हाती दिली होती. त्यावेळी आम्हाला वाटायचं, या ठिकाणी भगवं राज्य आहे. पण, आता ती शिवसेनाही राहिली नाही आणि ते राज्यही राहिले नाही. आता मुंबईला लुटण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून होत आहे, त्यामुळे आता मुंबईच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्याप्रमाणे लढाई लढली गेली, त्याप्रमाणे मुंबईला माफिया, लुटणाऱ्यांच्या हातातून काढायची आहे. त्या लढाईसाठी सज्ज राहा, असे आवाहन करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. (Now the battle for Mumbai's independence : Devendra Fadnavis)

भारतीय जनता पक्षाच्या पोलखोल अभियानाची सांगता मुंबईत आज (ता. १ मे) झाली. त्या सांगता सभेत माजी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेनेने मुंबई महापालिकेला खोदून खोदून खाल्ले आहे. त्यांनी मुंबईतील गरीब मराठी माणसांचा पैसा लुबाडला आहे. गेल्या २४ महिन्यांत तुम्ही सामान्य माणसांकडे दुर्लक्ष करत ३८ प्रॉपर्ट्या तयार केल्या. पण, भाजप आता या गरीब माणसांचा आवाज बनून उतरला आहे. आपल्याला मुंबईकरांसाठी संघर्ष करायचा आहे. मुंबईकरांकडे ही मुंबई पुन्हा द्यायची आहे.

आम्ही मुंबईच्या स्वातंत्र्याची लढाई म्हटल्यावर शिवसेनेचे पोपट म्हणतील, बघा आम्ही म्हणत होतो, मुंबई यांना महाराष्ट्रापासून तोडायची आहे. पण, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाच्या बापाची हिम्मत नाही. ही मुंबई महाराष्ट्राची आहे आणि ती अजन्म महाराष्ट्राचीच राहणार आहे. पण, शिवसेनेने भावनिक भाषा बोलून मुंबईला आजपर्यंत लुबाडले आहे. आता यापुढे हे चालणार नाही. ज्या प्रकारे संयुक्त महाराष्ट्रासाठी लढाई लढली गेली, त्याचप्रमाणे मुंबईला माफियांच्या हातातून काढायचे आहे. ही मुंबई सर्वसामान्यांच्या हाती सोपवायची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपवर तुटून पडा, असे सांगतात. मुख्यमंत्री महोदय, आमच्यावर तुटून पडाल ना तर तुम्ही तुटालही आणि पडालही. आमचं पक्कं आहे. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. पण, अंगावर आल्यावर सोडतही नाही. पोलिसांच्या पाठबळावर भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करता. आम्ही तर इंदिरा गांधींनासुद्धा घाबरलो नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला काय घाबरवणार आहात. असेल हिम्मत तर भ्रष्टाचाऱ्यांवर तुटून पडा ना. आम्ही भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लढा उभा केला आहे, त्यासाठी भाजप मैदानात उतरला आहे.

मुख्यमंत्र्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ माहिती होते आता ‘जेल फ्रार्म वर्क’ही पाहतोय!

महाविकास आघाडी सरकारने दारूवरील कर कमी केला. पण, पेट्रोलवरील कर कमी केला. परवा पंतप्रधान, पेट्रोलियम मंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारचा बुरखा फाटला. दारुडे, बिल्डरसाठी हे सरकार काम करत आहे. मात्र, सर्वसामान्यांसाठी काही केलेले नाही. सरकारच्या निर्णयावर नवाब मलिकांचा फोटो छापला आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ माहिती होते. पण, ‘जेल फ्रार्म वर्क’ही पाहतोय. तसेच, सर्वाधिक घोटाळे या सरकारने केले आहेत. कोविड मृत्यूच्या संख्येतही घोटाळे केले आहेत. न्यायालयाने सांगितले की, तृतीय पंथीयांना अनुदान द्या, त्यातही यांनी घोटाळा केला, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT