Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar On One Nation One Election: पंतप्रधान मोदींच्या 'वन नेशन-वन इलेक्शन'वर अजित पवारांची भूमिका काय ?

उत्तम कुटे

Mumbai Political News : पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. हे घटनेविरोधी असून भारतीय लोकशाहीत या निर्णयाची अंमलात आणता येणार नाही, अशा मवाळ शब्दांसह भाजप फक्त निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच हा डावपेच खेळत आहे, अशी कडवट टीकाही विरोधक करत आहेत. दरम्यान, विरोध करता करता भाजपसोबत राज्य सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही वन नेशन वन इलेक्शनवर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. (Latest Political News)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) 'वन नेशन वन इलेक्शन' या निर्णयासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर देशभरातील एनडीएतील पक्षांनी पाठिंबा दिला आहे. यात अजित पवारांचाही समावेश असून त्यांनीही असा निर्णय झाला ते स्वागतार्ह असेल, असे सांगितले. पवार म्हणाले, "हा निर्णय देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. त्यामुळे ती समर्थनीय आणि स्वागतार्ह आहे." यानिमित्ताने अजित पवारांचा गट या निर्णयाचे स्वागत करणारा राज्यात पहिला राजकीय नेता व पक्ष ठरला आहे.

या कल्पनेचे समर्थन करताना (Ajit Pawar) अजित पवारांनी कारणमिमांसाही केली. "देशात सातत्याने कुठेना कुठे निवडणुका होत असतात. यामुळे वेळ, पैसा, मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. त्यामुळे विकास खुंटतो. ‘वन नेशन, वन इलेक्शन’मुळे एकाचवेळी निवडणुका होतील आणि उर्वरित वेळ विकासकामांना गती देण्यासाठी उपयोगात आणता येईल", असे पवार म्हणाले. मोदींनी वेळोवेळी मांडलेल्या आणि केंद्र सरकारने आता पुढाकार घेतलेल्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेकडे सर्वांनी सकारात्मकपणे पहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

काळाप्रमाणे व्यवस्थेत सुधारणा अपरिहार्य असतात. परंतु त्या देश आणि लोकहिताच्या असल्या पाहिजेत, असे पवार म्हणाले. "मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ते धाडस दाखविले आहे. देशातील अनेक राज्यात सातत्याने होत असलेल्या निवडणुकांमुळे शासन, राजकीय पक्ष आणि उमेदवारांचा वारेमाप खर्च होतो. सतत निवडणुका झाल्याने त्या कामात प्रशासनाचा मौलिक वेळ वाया जातो. त्याचा विकासकामांना फटका बसतो. त्यामुळे ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही आवश्यक बाब होती. तिला मूर्त स्वरूप देण्याची वेळ आता आली आहे", असे ते म्हणाले.

केंद्राच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ च्या भूमिकेमुळे देशाच्या आणि राज्यांच्या समोरचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल, विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल, असा दावाही पवारांनी केला आहे. "यापूर्वी ‘वन नेशन, वन टॅक्स’ हा निर्णय मोदी सरकारने सर्व राज्यांच्या सहमतीने अंमलात आणला आणि यशस्वी करुन दाखवला. त्याच धर्तीवर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही भूमिका देशवासियांकडून मनापासून स्वीकारली जाईल", असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला. "मी आणि राष्ट्रवादी काँग्रस पक्ष ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेचे स्वागत करतो", असे पवार यांनी म्हटले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT