Mumbai News : " राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत आहे.आता दुसरीही लवकरच जाईल, हे जे काही सुरू आहे, ते आताचंच नाही तर २०१४ पासून सुरू आहे," असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे मनसेची बैठक पार पडली.
या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या वर्षात तरी महापालिका निवडणुका होतील, असं काही वातावरण मला दिसत नाही. त्यामुळे आम्ही लोकसभेच्या अनुषंगाने चर्चा केली, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात जो काही राजकीय घोळ झालेला आहे, ते पाहता महापालिका निवडणुका लावण्याचा कोणी धोका पत्करतील, असं मला वाटतं नाही. आता ज्या निवडणुका लागतील त्या लोकसभेच्याच लागतील, त्या अनुषंगाने प्रत्येक लोकसभा मतदार संघासाठी आमची चाचपणी होईल. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आमच्या टीम जातील आणि काम करतील, लोकसभेसाठी ज्या टीम पाठवायच्या आहेत, जी लोक पाठवायची आहेत, त्याबद्दल आजची बैठक होती. त्यासाठी आमच्या टीम तयार असून त्यांना दोन दिवसात त्यांच्या हातात संपूर्ण कार्यक्रम दिला जाई, आणि त्यानुसार ते काम करतील.
परवा पनवेलमध्ये माझा मेळावा आहे. त्यादिवशी मुंबई-गोवा महामार्गावर जे काही बोलायचं आहे ते मी बोलेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात पुण्यात झालेल्या गुप्त बैठकीबाबत माध्यमांनी विचारले असता, राज ठाकरे म्हणाले, त्यांनी एक टीम आधी पाठवली आता दुसरीही टीम जाईल. पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर झालेल्या गोष्टी तुम्हाला आठवत नाहीत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, आमच्याकडून महाराष्ट्राची प्रतारणा होणार नाही याची आम्ही काळजी घेत होतो, यापुढेही घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.