Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar News Sarkarnama
मुंबई

Prakash Ambedkar News: 2024 पर्यंत काय होणार हे फक्त मोदी आणि शाहच ठरवतील; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी काही दिवसांपूर्वी राज्यात पुढील १५ दिवसांत दोन मोठे राजकीय भूकंप होणार असल्याचं विधान केलं होतं. त्यांच्या त्या विधानाची मोठी चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी २०२४ पर्यंत देशात नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे जे ठरवतील तेच होणार असं मोठं विधान केलं आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) आणि सुजात आंबेडकर या पिता-पुत्रांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील राजकीय परिस्थितीसह विविध घडामोडींवर मनसोक्त गप्पा मारल्या. यावर प्रकाश आंबेडकरांनी 2024 पर्यंत काय होणार हे फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोन व्यक्तीच ठरवतील. या राज्यात कमी आमदार येत आहेत असं त्या त्या राज्यातील राजकीय पक्ष संपवण्याची प्रक्रिया सुरु होईल असं वक्तव्य केलं आहे.

अमित शाह(Amit Shah) यांनी कोल्हापूरमध्ये राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 48 जागा घेणार असं विधान केलं होतं. पण हे त्यांचं राजकीय वक्तव्य नव्हतं. ते कोणतंही वक्तव्य करायचं म्हणून करत नाहीत. त्यामागे काय मिळवायचं, कसं मिळवायचं हे ठरलेलं आहे. त्यामुळे त्याचं वक्तव्य हलक्यात घ्यायला नको. महाराष्ट्रातली स्ट्रॅटेजी त्यांनी सुरु केली आहे असंही आंबेडकर म्हणाले.

100 टक्के जरी आरक्षण दिलं तरी...

प्रकाश आंबेडकरांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर थेट भाष्य केलं. आंबेडकर म्हणाले, आरक्षणाच्या मुद्द्याकडे ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं पाहिजे. शिवाजी महाराजांशिवाय इतर कोणीही आरक्षणाला त्यांच्या राज्यव्यवस्थेत जागाच दिली नाही. देशाचा गुलामीचा इतिहास पाहिला तर असे प्रसंग सापडतात की, बाहेरच्यांनी आपल्याला हरवण्यापेक्षा आतल्यांनी माहिती दिल्यामुळे आपण हरलो. याला सामाजिक अर्थ आहे.

आरक्षण हे विकासात्मक आहे असा कोणी विचार करु नये, असं माझं म्हणणं आहे. ते हे व्यवस्थेमध्ये शाश्वतपणा यावा म्हणून तुमचाही प्रतिनिधी आहे, एवढ्यापुरतंच मर्यादित आहे. 100 टक्के जरी आरक्षण दिलं तरी प्रत्येकाला शाश्वत करु शकतो असं नाही असं स्पष्ट मत आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT