Operation Tiger Shiv Sena : ‘ऑपरेशन टायगर’वर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रचंड आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षातील मंत्री, आमदार, खासदार आणि आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला असतानाच आता एका वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील फुटलेल्या सहा खासदारांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या कार्यक्रमात शिंदे शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांनी केलेल्या एका वक्तव्याने मोठा वाद निर्माण केला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी पूर्वी केलेल्या विधानाचा संदर्भ घेत पावसकर म्हणाले, “मुलाला आणि नातवाला सांभाळायला हे काय पाळणाघर आहे का?”
हे वक्तव्य होताच शिवसेना ठाकरे पक्षाने (Shivsena UBT) जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक आणि प्रवक्ते अखिल चित्रे यांनी या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत थेट शिंदे गटावर हल्लाबोल केला.
अखिल चित्रे म्हणाले, ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर राजकारण करता, ज्या बाळासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक होता, त्यांच्याच वचनांची सार्वजनिकपणे खिल्ली उडवण्याची हिंमत आता शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये आली आहे. त्यांनी पुढे आरोप केला की, किरण पावसकर यांनी एकनाथ यांच्या उपस्थितीत केलेली टिप्पणी ही केवळ उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर टीका नसून लाखो शिवसैनिकांच्या श्रद्धास्थानाचा अपमान आहे.
सत्ता मिळाल्यानंतर इतका अहंकार आला आहे की, आता बाळासाहेबांचे शब्दही विनोद वाटू लागलेत? मग रोज बाळासाहेबांचे नाव घेण्याचा आणि त्यांच्या विचारांचे वारसदार असल्याचा दावा करण्याचा नैतिक अधिकार तरी उरतो का? असा थेट सवालही चित्रे यांनी उपस्थित केला.
यापुढे त्यांनी शिंदे गटावर आणखी जोरदार हल्ला चढवत म्हटले की, खरी शिवसेना कोणाची हे न्यायालय ठरवेल, जनता ठरवेल; पण बाळासाहेबांबद्दल मनात आदर कोणाच्या आहे आणि कोण फक्त त्यांच्या नावाचा राजकीय वापर करत आहे, हे महाराष्ट्राने पुन्हा पाहिले.
वाद इथेच थांबला नाही. अखिल चित्रे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही उल्लेख करत शिंदे शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले, अमित शाहांचे सैनिक झालेल्यांना बाळासाहेबांचे विचार नकोत, फक्त त्यांचे नाव हवे आहे. बाळासाहेबांचा अपमान मराठी माणूस सहन करणार नाही. फेकनाथ मिंधे, महाराष्ट्राची आणि शिवसैनिकांची माफी मागा!
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसत असून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद उभा राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.