Uddhav Thackeray MP meeting news : शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला अन् अचानक ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार त्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आले. त्यातच रविवारी ठाकरेंनी मुंबईत सर्व खासदारांची बैठक बोलाविल्याने ‘ऑपरेशन टायगर’ पुष्टी मिळाल्याचे बोलले जाऊ लागले.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे लोकसभेत नऊ आणि राज्यसभेत दोन खासदार आहेत. राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी पुढील काही दिवसांत निवृत्त होणार आहे. त्यामुळे राज्यसभेत केवळ संजय राऊत एक एकमेव खासदार असतील. दरम्यान, आज ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत राऊत यांच्यासह एका लोकसभा खासदारांची अनुपस्थिती होती.
बैठकीत कोण-कोण?
पक्षाच्या अधिकृत एक्स हॅंडलवर बैठकीबाबत माहिती देण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांची बैठक आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीचे फोटोही सोशल मीडियात पोस्ट करण्यात आले आहे. बैठकीला आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
त्याचप्रमाणे खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, खासदार प्रियांका चतुर्वेदी, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार नागेश पाटील-आष्टीकर, खासदार संजय दिना पाटील, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार संजय देशमुख, खासदार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते, अशी माहिती पोस्टमध्ये दिली आहे.
बैठकीला परभणीचे खासदार संजय जाधव हे अनुपस्थित होते. त्यांचे नाव पोस्टमध्ये देण्यात आलेले नाही. तसेच फोटोमध्येही ते दिसत नाहीत. सर्व खासदार बैठकीसाठी उपस्थित असताना संजय जाधव का उपस्थित राहिले नाहीत, याबाबत आता उत्सुकता वाढली आहे. अद्याप जाधव यांच्याकडून बैठकीबाबत कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
दरम्यान, उद्धव ठाकरेंवर खासदार नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. बैठकीनंतर मीडियाशी बोलताना सावंत यांनी या सर्व वावड्या असल्याचे स्पष्ट केले. उद्धव ठाकरे हे सोमवारी दिल्लीत संजय राऊत यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला येणार होते. तिथेच सर्व खासदारांना भेटणार होते. मात्र, विधानपरिषदेचा त्यांचा कार्यकाळ संपत असल्याने सोमवारी निरोप दिला जाणार आहे. त्यामुळे आम्हीच ही भेट घडवून आणली, असे सावंत यांनी स्पष्ट केले.
सत्ताधाऱ्यांकडून विरोधी लोकप्रतिनिधींबाबत निधीवाटपात दुजाभाव केल्याचा आरोपही सावंत यांनी केला. यासह इराण युध्दामुळे निर्माण झालेला गॅस तुटवडा आदी मुद्द्यांवर संसदेत सर्व खासदारांनी एकसंध राहून सरकारला घेरण्याच्या सचूना उद्धव ठाकरेंनी बैठकीत केल्याची माहिती सावंत यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.