Haresh Keni News : पनवेलच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणारा निर्णय भाजपचे नेते आणि माजी पंचायत समिती सभापती हरेश केणी यांनी घेतला आहे. केणी यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केणींचा हा निर्णय भाजपसाठी धक्कादायक ठरणार आहे.
हरेश केणी हे पूर्वाश्रमीचे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते असून 2019 साली त्यांनी शेकापकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांना त्यांनी जोरदार टक्कर दिली होती. मात्र स्थानिक नेतृत्वावर नाराज होऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर प्रभाग क्रमांक तीनमधून पालिका निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. परंतु पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आपल्याला सहभागी केले जात नसल्याचा आरोप करीत अखेर त्यांनी पक्षाला रामराम केला.
पनवेल महापालिकेत भाजपचे आमदारबंधू परेश ठाकूर यांच्यासोबत केणींचे संबंध फारसे चांगले राहिले नाहीत. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या भूमिकेमुळे देखील ते नाराज असल्याचे बोलले जाते. 2019 पासून भाजपमध्ये सामील झालेल्या केणींसोबत नगरसेविका शितल केणी, जयश्री म्हात्रे, तसेच नगरसेवक पापा पटेल आणि बबन मुकादम हे देखील भाजपवासी झाले होते. आता त्यांच्यासह काही पदाधिकारीही पक्ष सोडण्याची शक्यता आहे.
तळोजा परिसर मुस्लिमबहुल असल्याने भाजपला येथे तुलनेने कमी मतदान मिळते. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपचे उमेदवार ठाकूर यांच्या विरोधात बाळाराम पाटील यांना आघाडी दिली होती. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. यामुळेच केणी महाविकास आघाडीच्या गटातून निवडणूक लढवण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
केणी हे शेकापमध्ये परत जाण्याची शक्यता अल्प आहे, कारण पक्षात मोठी फूट पडली आहे. भाजपमध्ये जिल्हा कार्यकारिणीत संधी न मिळाल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पातळीवर असल्याने, काँग्रेसला प्राधान्य देण्याची केणींची शक्यता व्यक्त केली जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.