किसान विकास समृद्धी मेळाव्यात सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो आणि नाव वगळल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी तक्रार केल्यानंतर आयोजकांनी रातोरात निमंत्रण पत्रिका व फलक बदलून अजित पवार यांचा फोटो व नाव समाविष्ट केले.
या घटनेतून महायुती सरकारमध्ये अद्याप अंतर्गत मतभेद असल्याचे दिसून आले, ज्यामुळे भाजप–राष्ट्रवादी–शिवसेना यांच्यातील स्थानिक पातळीवरील संघर्ष उघड झाला.
Nagpur News: राज्यात तीन पक्षांचे महायुतीचे सरकार असले तरी एकमेकांना डावलण्याची संधी एकही पक्ष सोडत नाही. दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघात झालेल्या किसान समृद्धी मेळावा आणि कृषी प्रदर्शनात असाच प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित दादांच्या निदर्शनास आणून देताच रातोरात आयोजकांना निमंत्रण पत्रिकेसह कार्यक्रमाचे फलक बदलावे लागले.
त्यानंतर सर्वच कार्यक्रमाशी संबंधित सर्वच फलकांवर अजित दादांचे फोटो झळकले. झालेली चूक नंतर सुधारण्यात आली असली तरी यातून महायुती ही फक्त वरिष्ठ पातळीवरच असल्याचे समोर आले. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्र्यांना मुद्दामच डावलण्याचा प्रयत्न केल्याचा रोष राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कायम आहे.
रामटेक विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या पुढाकाराने किसान विकास समृद्धी मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेळाव्याचे उद्घाटक तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी आणि आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर विशेष अतिथी यांचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेत करण्यात आला होता. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो व नावाचा उल्लेख नव्हता. ही बाब राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांना खटकली.
त्यांनी आयोजकांना आयोजकांना याची विचारणा केली. मात्र कोणीच त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. याची दखल घेऊन आयोजकांना अजित पवार यांचा उल्लेख का टाळण्यात आला अशी विचारणा करण्यात आली. त्यानंतर आयोजक व प्रशासनामध्ये एकच तारांबळ उडाली. नंतर तातडीने निमंत्रण पत्रिकेत सुधारणा करण्यात आली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेजारी अजित पवार यांच्या फोटो टाकण्यात आला आणि कार्यक्रमाचे मुख्य अतिथींमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. कार्यक्रमस्थळी डिजिटल फलकावरही अजित दादांचे नाव झळकावून वाद निकाली काढण्यात आला. विशेष म्हणजे रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावेळीसुद्धा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला होता. भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी कट्टर विरोधक काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्याशी हातमिळवणी केली होती. त्यावेळीसुद्धा बाबा गुजर यांनीच याची तक्रार केली होती.
Q1: रामटेक मेळाव्यात वाद का झाला?
👉 निमंत्रण पत्रिका आणि फलकांवर अजित पवार यांचा फोटो व नाव नव्हते.
Q2: तक्रार कोणी केली?
👉 राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी याबाबत तक्रार केली.
Q3: आयोजकांनी समस्या कशी सोडवली?
👉 रातोरात निमंत्रण पत्रिका व डिजिटल फलकांवर अजित पवार यांचा समावेश केला.
Q4: या प्रकरणातून काय स्पष्ट झाले?
👉 महायुती सरकारमध्ये स्थानिक स्तरावर अद्याप मतभेद आणि गटबाजी सुरू असल्याचे दिसले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.