मुंबई : आम्ही पीत नसल्याने आपल्याला वाईन आणि दारूमधील फरक समजत नाही. पण, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच तो समजून द्यावा. किराणा दुकानांमध्ये वाईन उपलब्ध करण्याच्या निर्णयाला विरोध झाल्यामुळे पवारांना दुःख झाले असले तरी, या निर्णयाच्या विरोधात गावोगाव महिला रस्त्यावर उतरल्यानंतर पवारांना खरे दुःख होईल, असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला आहे.
चंद्रकांतदादा पाटील बुधवारी मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, ''वाईन म्हणजे दारू नाही असे सांगणे हा तमाशा काय चालला आहे, हे कळत नाही. छाप्यात गांजा सापडला की त्याला हर्बल तंबाखू म्हणायचे तसेच वाईन म्हणजे दारू नव्हे असे समर्थन चालू आहे. वाईन ही दारू नसेल तर दारुच्या दुकानावर वाईन शॉप असा बोर्ड लावू नका.'' त्याच्या जागी अमृत शॉप, नीरा शॉप असे काहीही म्हणा.
ते पुढे म्हणाले की, ''वाईनचा निर्णय हा मुठभर लोकांचे भले करण्यासाठी घेतला आहे. पण, हा निर्णय शेतकऱ्याच्या भल्यासाठी घेतल्याचे दाखविले जात आहे. शेतकऱ्यांचे भले करणार असाल तर गेल्या दोन वर्षात राज्यात शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी काय केले ते सांगा. अजूनही अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तीसाठीची नुकसान भरपाई पोहोचलेली नाही, शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण नाही, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळालेले नाही.''
चंद्रकांत पाटील म्हणाले, ''किराणा मालाच्या दुकानात वाईन उपलब्ध करण्याच्या निर्णयामुळे जनतेत संताप आहे. विशेषतः ग्रामीण भागात महिलांमध्ये या निर्णयाला तीव्र विरोध आहे. गावोगावच्या महिला आता रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करतील त्यावेळी शरद पवारांना खरे दुःख होईल.''
ते पुढे म्हणाले, ''महाविकास आघाडी सरकार जनतेच्या संयमाची परीक्षा पाहत आहे. मोदी सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून दिलासा दिला. पाठोपाठ २२ राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी करून जनतेला अधिक दिलासा दिला. परंतु महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारने अजूनही पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केलेला नाही. आता या विषयावर मोठे आंदोलन झाल्यावरच या सरकारचे डोळे उघडतील.''
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.