मुंबई : फोन टॅपिंग (Phone Tapping)प्रकरणी जबाब नोंदविण्यासाठी पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla)या कुलाबा पोलिस ठाण्यात पोहचल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या दूरध्वनीचे बेकायदा अभिवेक्षण (Phone Tapping) केल्याप्रकरणी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलिसांनी ५ मार्चला गुन्हा दाखल केला होता. (Rashmi Shukla phone tapping case News)
आपल्याविरोधात नोंदवण्यात आलेला हा गुन्हा खोटा आणि राजकीयदृष्टय़ा प्रेरित असल्याचा दावा करून शुक्ला यांनी अटकेपासून संरक्षण देण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ''शुक्ला यांच्यावर १ एप्रिलपर्यंत कोणतीही कारवाई करू नये,'' असे आदेश उच्च न्यायालयाने कुलाबा पोलिसांना दिले होते.
त्याच वेळी शुक्ला यांनी १६ व २३ मार्चला जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांसमोर हजर राहावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानुसार आज त्या कुलाबा पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यासाठी पोहचल्या आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत (sanjay raut), राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या फोन टॅपिगप्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात शुक्लांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.
मागील वर्षी विधिमंडळाच्या अधिवेशनात २०१५ ते २०१९ या पाच वर्षाच्या कालावधीमधील फोन टॅपिंग प्रकरणी प्रश्न उपस्थित झाला होता. याची पडताळणी करण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. संबंधित समितीने २०१५ ते २०१९ या कालावधीमधील फोन टॅपिंगची पडताळणी केली होती. या समितीने राज्य सरकारकडे अहवाल दिला होता. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी रश्मी शुक्ला असताना हे फोन टॅपिंग झाले होते. सरकारने या अहवालाच्या आधारे पुणे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. शुक्ला यांनी त्यांच्या कार्यकाळात बेकायदा पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचे या अहवालात म्हटलं आहे.
शुक्ला यांनी नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख आणि संजय काकडे यांचे फोन टॅप केले होते. नाना पटोले यांच्या नावासमोर अमजद खान असे लिहून त्यांचे फोन टॅप केले होते. बच्चू कडू यांचे नाव निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे यांचे नाव अभिजित नायर तर आशिष देशमुख यांचे नाव महेश साळुंके असे दाखवले होते.
शुक्ला यांनी कायद्याचा भंग केला आहे. यात शुक्ला यांच्यावर सूड भावनेतून कारवाई केलेली नाही. ही घटना काल घडलेली नाही. यावर विधानसभेत चर्चा होऊन चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आता सरकारने स्वीकारला आहे, असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकतेच सांगितले आहे. शुक्ला या सध्या हैद्राबादमध्ये प्रतिनियुक्तीवर असून, त्यांच्यावर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) अतिरीक्त पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.