pm modi, uddhav thackeray, manoj jarange patil Sarkarnama
मुंबई

Modi in Shirdi : महाराष्ट्रात आले आहात, तर जरांगे पाटलांची भेट घ्या; उद्धव ठाकरे PM मोदींना थेट बोलले

Sachin Fulpagare

Prime Minister Narendra Modi in Shridi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मोदी शिर्डीत आले असताना दुसरीकडे 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट ) उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींना मोठं आवाहन केलं आहे.

'मातोश्री'वर आज काही जणांनी ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. ठाकरे गटात इन्कमिंग आणि आउटगोइंगही सुरू आहे? असा प्रश्न पत्रकारांनी या वेळी उद्धव ठाकरे यांनी विचारला. 'दोघांचाही अर्थ स्पष्ट आहे. आउटगोइंग आहे ते कशासाठी बाहेर चालले हे दिसतंय. आणि जे इन्कमिंग आहे, त्याचं मला महत्त्व जास्त आहे. ते ठाकरे गटात येताहेत म्हणून नाही, तर आउटगोइंग सत्तेच्या दिशेने चालले आहे. आणि इन्कमिंग हे सत्ता आणण्यासाठी होत आहे', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पक्षातून बाहेर पडणाऱ्यांना टोला लगावला आहे.

'अनेक जण येत आहे. काल भाजपमधून एकनाथ पवार आले आहेत. कारण राजकारणाचा सध्या खेळखंडोबा झालेला आहे. नीतिमत्ता शून्य असे राजकारण झाले आहे. आणि हे कुणालाही पटत नाही. या विरोधात लढणारे लढवय्ये माझ्यासोबत येत आहेत. हे राजकारण गाडून टाकण्यासाठी ते शिवसेनेत येत आहेत', असं उद्धव ठाकेर म्हणाले.

या वेळी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणावरून उद्धव ठाकरे यांना प्रश्न केला. 'मराठा आरक्षणावर खूप लोकांनी बोलून आता त्याच्यावर गोंधळ घालू नये. नेमकेपणाने तो कसा सुटेल त्यादृष्टीने विचार करण्याची गरज आहे', असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण देणारच, अशी शपथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने घेतली. यावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. 'शपथ जरूर घ्या, पण मग तुमच्याकडे मार्ग काय आहे, तो त्यांना समजून सांगा. शपथ घेणं हा भावनिक प्रकार झाला. शपथ घेऊन वेळ काढणं हा काही मार्ग नाही. जरांगे पाटील यांनी ४० दिवस दिले होते. त्यावेळी शपथेला जागून त्यांना न्याय हक्क देण्याची गरज होती, तो दिला नाही. आम्हालाही बोलवू नका. जरांगे पाटील यांना बोलवा. मराठा समाजाचे लढवय्ये नेते आहेत, त्यांना बोलवा. त्यांच्याशी बोला आणि मार्ग दाखवा. शपथा घेण्यापेक्षा मार्ग काढा आणि मोकळे व्हा. दीड वर्ष झालं आता', असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे बोलले...

'पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, त्यांचं स्वागत आहे. पंतप्रधानांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सोडवावा', अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT