मुंबई : ‘‘शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या युतीबाबत ठाकरे (Thackeray) परिवारातील लोक भाष्य करत असतील, तर नाण्याची दुसरी बाजूदेखील महाजन परिवार सांगेल. युतीत शिवसेना सोडली, असं भाष्य ठाकरे करतात, तर महाजन परिवारही सत्य समोर आणेल. हे त्यांनी लक्षात ठेवावे,’’ असा सज्जड इशारा भाजपच्या खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांनी दिला. (Poonam Mahajan criticizes Thackeray over Shiv Sena-BJP alliance)
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात खासदार पूनम महाजन बोलत होत्या. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी एक जुने व्यंगचित्र ट्विट केले होते. खासदार पूनम महाजन यांनी त्याला प्रत्युत्तर देत नामर्दासारखं ट्विट करू नका, असा इशारा दिला होता. त्यानंतर राऊत यांनी आपल्या ट्विटरवरून ते ट्विट डिलिट केले होते. या प्रकरणावर पूनम महाजन यांनी सार्वजनिक कार्यक्रमात प्रथमच भाष्य केले.
युतीमध्ये आम्हाला कसा त्रास झाला, असे एक परिवार बोलत आहे. नाण्याची एक बाजू ठाकरे असतील, तर दुसरी बाजू महाजन आहे. आम्हालाही भरपूर माहीत आहे की, आत काय होते आणि बाहेर काय होते. पण आम्ही त्या संस्कारात वाढलेले नाही आहोत. आमच्या संस्काराला कमी लेखू नका. शिवसेनेकडून युतीबाबत जेव्हा जेव्हा बोलले जाईल, तेव्हा आम्ही त्यावर बोलणारच. त्यांचा एक बॉल आला, तर आपले दहा बॉल त्यांच्यावर जातील, अशी ताकद आम्ही तुम्हाला देऊ, असेही पूनम महाजन म्हणाल्या.
महाजन म्हणाल्या की, ट्विटरवरून वारंवार नळावर भांडल्यासारखं भांडत राहायचं, असे मला बिलकुल आवडत नाही. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याचे काम करेल. आपल्याला ते भेटतील, तर आपल्यालाही त्यांना उत्तर द्यावं लागेल. आत्मसन्मान हवाय; पण अहंकार नको. काहींच्या डोक्यात अहंकार भरलाय. भविष्यात मुद्दामहून आपल्या लोकांना त्रास दिला जाईल, त्याला प्रत्युत्तर द्या. मुंबईचा आगामी महापौर भाजपचाच असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.