मुंबई : ''लाऊडस्पीकर संदर्भातला अंतिम निर्णय घेण्याआधी मी राज ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची आणि काही संघटनांची बैठक बोलावून चर्चा करणार आहे. त्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल", अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदींच्या भोंग्यावरून सुरु असलेल्या वादाने राजकारण तापले आहे. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकतीच राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यासोबत बैठक घेतली.
तसेच या बैठकीत राज्यातील कायदा आणि सुस्थितीचा आढावा घेण्यात आला. याविषयी प्रसार माध्यमांशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने २००५ भोग्यासंदर्भात दिलेला निकाल दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने २०१७ मध्ये एक जीआर काढला. त्यात लाऊड स्पिकरची मर्यादा ठरवून दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आदेशही देण्यात आले होते, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तर दूसरीकडे भोंग्यांच्या मुद्द्यांवरुन काही मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या आहेत. अनेक मौलवींनी मशिदींवरील भोंगे खाली उतरविण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे येत्या 3 मे नंतर राज्यात भोंग्यावरुन मोठा संघर्ष होण्याची भितीही व्यक्त केली जात आहे. याबाबत दिलीप वळसे पाटील यांनी एका गोपनीय अहवालाचा संदर्भ देत राज्यात 3 मे नंतर अराजकता निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे गृहखातंही सतर्क झालं असून कामाला लागलं आहे. राज्यावर येणाऱ्या संकटाच्या पार्श्वभूमीवर वळसे पाटील यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मी एक आढावा बैठक घ्यायला सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी ती बैठक घेत त्या बैठकीतला सगळा अहवाल माझ्याकडे दिला. या अहवालात, राज्यात 3 मे नंतर विस्फोटक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली असल्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
याबाबत बोलताना ते म्हणाले की, ''गेल्या काही दिवसांपासून काही लोकांकडून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याबाबत सरकार सतर्क झाले आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की, कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नका. संघर्ष वाढवू नका. समाजात तेढ निर्माण होईल अशी कोणतीही कृती करु नका. अशी कृती कुणाकडूनही झाली तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल."असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.