मुंबई : 'देशाच्या घाऊक महागाईच्या वार्षिक दराने (WPI) तीस वर्षांतील उच्चांक गाठला आहे. मार्च २०२२ मध्ये हा दर १४.५५ टक्क्यांवर गेला आहे. याचा अर्थ असा की, जे आम्हाला म्हणाले की भारतामध्ये (India) जे साठ वर्षांमध्ये झाले नाही ते करून दाखवू, निश्चितच त्यांनी हे करून दाखवलं,' असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रदेश प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांना लगावला.
माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना महेश तपासे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टिका केली. 'गेल्या तीस वर्षात इतकी महागाई नव्हती. घाऊक महागाई दर हा १४.५५ टक्क्यांवर गेला आहे आणि लोकांचे दरडोई उत्पन्न खालावलेले आहे. महागाईसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावरून लोकांचं लक्ष विचलित व्हावं म्हणूनच जातीपातीचं राजकारण केलं जात आहे. आज महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये गोळा करून अलिशान गाड्या आणि मालमत्ता सदावर्ते यांनी गोळा करत भोळ्या भाबड्या एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांचा खेळ केला आहे असा आरोप महेश तपासे यांनी केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्यातील ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांना सरकारमध्ये विलिनीकरण करुन देतो सांगून प्रत्येकी रकमा गोळ्या केल्या आहेत. ते पैसे एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी किंवा जे आंदोलनात मयत झाले त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सदावर्ते यांनी द्यायला हवे होते असेही महेश तपासे म्हणाले.
शिवाय सदावर्ते यांच्या घरी पैसे मोजण्याची मशीनही सापडली आहे. सदावर्ते यांच्या घराच्या गच्चीवर पवारसाहेबांच्या घरावर हल्ला करण्याअगोदर बैठका झाल्याचे तपासात उघड झाले आहे. एकंदरीतच गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळण्याचे काम केल्याचा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.
पवारसाहेबांना 'आप' च्या प्रदेशाध्यक्षांनी पत्र दिले असून त्या पत्रात देशात जे धार्मिक द्वेषाचे ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू आहे त्याविरोधात पवारसाहेबांनी आवाज उठवावा अशी मागणी केली आहे. त्या पत्राचे महेश तपासे यांनी स्वागत केले आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे, त्यांचे हात बळकट व्हावे आणि संविधानाचे रक्षण केले पाहिजे ही भूमिका पवारसाहेबांनी सुरुवातीपासून घेतली आहे असेही महेश तपासे म्हणाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममतादीदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कॉंग्रेसनेही या मागणीला साथ दिली आहे. आता देशात भाजप विरोधी संघटना निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे देशात युपीएचे सरकार यायला तो दिवस लांब नाही असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.