Pradeep Purnekar Murder case Meenakshi Shinde | Pratap Sarnaik Sarkarnama
मुंबई

Pradeep Purnekar case : पूर्णेकर हत्या प्रकरणात अटकेची मागणी होत असतानाच मीनाक्षी शिंदेंना पहिला मोठा धक्का! मंत्री सरनाईकांच्या मागणीमुळे चर्चांना उधाण

Pratap Sarnaik on Pradeep Purnekar Murder case : ठाण्यातील कालच्या राड्यानंतर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले. मुंबईत बसून आरोप करण्याऐवजी ठाण्यात येऊन बोला, चुकीचे आरोप सहन केले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Jagdish Patil

Thane News, 28 Oct : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हत्येला २८ दिवस उलटूनही माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर ठोस कारवाई न झाल्याने मंगळवारी पूर्णेकर कुटुंबीय आणि समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.

अशातच आता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मीनाक्षी शिंदे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, असं वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर हे मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

त्यानंतर पूर्णेकर कुटुंबीयांसह ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी नौपाडा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी समर्थकांनी घोडबंदर रोड, मानपाडा, कापूरबावडी आणि बाळकुम परिसरात रास्ता रोको केला. काही ठिकाणी टायर जाळण्यात आल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली.

या आंदोलनामुळे ठाण्यातील प्रमुख रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली. मुंबई-ठाणे आणि गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूकही प्रभावित झाली. अखेर पहाटे पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना हटवले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

दरम्यान, पूर्णेकर हत्या प्रकरण तापलेलं असतानाच आता राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. "प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मीनाक्षी शिंदे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे माझे वैयक्तिक मत आहे. याबाबतच्या भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही कळवल्या आहेत," असे सरनाईक यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे, शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले. मुंबईत बसून आरोप करण्याऐवजी ठाण्यात येऊन बोला, चुकीचे आरोप सहन केले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई व्हावी, हीच आमची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणाच्या निषेधार्थ गुरुवारी सायंकाळी ठाण्यात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह विविध पक्षांचे नेते सहभागी होणार असल्याने ठाण्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT