Prafull Patel  Sarkarnama
मुंबई

Praful Patel : राष्ट्रवादी कुणाची ? निवडणूक आयोगाच्या सुनावणीपूर्वी प्रफुल पटेलांचा गौप्यस्फोट, ४३ आमदारांचा पाठिंबा !

Election Commission : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं?

Rashmi Mane

सचिन फुलपगारे

Praful Patel : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं? यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. या सुनावणीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. या सुनावणीपूर्वी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्रातील ५३ पैकी ४३ आमदार अजित पवारांसोबत आहेत, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली आहे.

निवडणूक आयोगातील सुनावणीच्या आधी प्रफुल पटेल यांनी दिल्लीत वकिलांशी चर्चा केली. यानंतर पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल. महाराष्ट्रातील ५३ पैकी ४३ आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. तसेच नागालँडमधील सर्व ७ आमदारही आमच्यासोबत आहेत. आम्ही लाखोंच्या संख्येत प्रतिज्ञापत्र दाखल केली आहेत. संघटनेतील कार्यकर्ते, नेते आणि आमदार, खासदार हे बहुसंख्येने आमच्याकडे आहेत, असा दावा प्रफुल पटेल यांनी केला आहे.

आम्ही प्रत्येक आमदाराचं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. आणि हे सर्व प्रतिज्ञापत्र ३० जूनला सादर करण्यात आले आहेत. काही नंतर आणि जे परदेशात होते, अशा आमदारांची प्रतिज्ञापत्र नंतर दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पटेल यांनी दिली. आमच्याकडचे लोक हे त्यांच्या संपर्कात (शरद पवार गट) असल्याचा दावा केला जातोय. पण त्यापेक्षा त्यांकडचे आमदार आमच्या संपर्कात आहेत, हे आम्ही ठामपणे सांगू शकतो, असं पटेल म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या सुनावणीला शरद पवार उपस्थित राहणार असल्याने दबाव असेल का? असा प्रश्न पटेल यांना विचारण्यात आला. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. आयोगाच्या सुनावणीला कोण उपस्थित आहे, हे महत्त्वाचं नाही. तथ्य काय आहे आणि कायदा काय म्हणतो त्यानुसार निवडणूक आयोग आपली प्रक्रिया पूर्ण करेल. आणि निवडणूक आयोगासमोर सादर केलेली कागदपत्र आणि वकिलांनी दिलेल्या सल्ल्याच्या आधारावर आम्हाला नक्कीच निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देईल आणि चिन्हही आमच्याकडे राहील, असा ठाम विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.

दरम्यान, निवडणूक आयोगात होणाऱ्या सुनावणीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. अभिषेक मनु सिंघवी हे शरद पवार गटाकडून युक्तिवाद करणार आहेत. तर अजित पवार यांच्या गटाकडून नीरज कौल, मनिंदर सिंग हे बाजू मांडणार आहेत.

SCROLL FOR NEXT