Prakash Ambedkar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात बंद दाराआड तब्बल अडीच तास चर्चा झाल्याचं समोर आलं आहे.यानंतर राजकीय वर्तुळात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आणि वंचित नेमकी कुणासोबत जाणार शिंदे की ठाकरे गट याविषयी राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. मात्र,आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीतील चर्चेवर आपली भूमिका स्पष्ट करतानाच एक मोठं विधान केलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये आम्ही ठाकरे गटासोबत लढविणार असल्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. भाजप ज्या पक्षासोबत आहे, त्या पक्षासोबत युती करायची नाही हे आमचं ठरलेलं आहे. आम्ही अशा पक्षांसोबत कधी गेलो नाही. याची जाणीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आहे. विरोधकांचा विरोधक आपला मित्र हे सूत्रं राजकारणात असतं.पण आमचं भाजप आणि संघासोबत व्यवस्थेचं भांडण आहे. जी व्यवस्था आम्ही उद्ध्वस्त केली. तीच भाजप आणू पाहत आहे. त्यामुळे आम्ही भाजप सोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आमचं तात्त्विक भांडण आहे.
याचमुळे आम्ही भाजप किंवा त्यांच्यासोबत असणार्या पक्षाशी आम्ही युती करणार नाही ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. पण भाजपची साथ सोडली तर शिंदे गटासोबतच्या युतीबाबत विचार करु असेही प्रकाश आंबेडकर( Prakash Ambedkar) म्हणाले.
आम्ही मागील ३५ वर्षांपासून राजकारणात आहोत. आमचे राष्ट्रवादी, काँग्रेसमुळे नुकसान झाले. मात्र, तरीदेखील आम्ही भाजपासोबत गेलो नाहीत. आम्ही इतकी वर्ष काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिलो पण त्यांनी आमचा खिमा केला.मात्र, आम्ही जर त्यावेळी भाजपसोबत गेलो असतो तर आम्हीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा खिमा केला असता असं विधानही आंबेडकर यांनी केलं आहे.
उध्दव ठाकरेंना वंचितला सोबत घेताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीही सोबत हवी आहे. त्यांना एकत्र घेण्यासाठी ठाकरेंचे प्रयत्न सुरु आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीही आमच्यासोबत यायला तयार होणार नाही. हे आम्हांला माहीत आहे. तरीही ठाकरे प्रयत्न करताहेत. त्यांना प्रयत्न करु द्या असेही आंबेडकर यावेळी म्हणाले. आम्ही ठाकरे गटासोबत युती करणार हे जाहीर केलं आहे. आमचं जागावाटपही ठरलं आहे. फक्त आता ठाकरेंनी आपली भूमिका जाहीर करावी असंही आंबेडकर यावेळी म्हणाले.
उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युती संदर्भात चर्चा सुरु आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरेंसोबत युती करणार असल्याचं जाहीर केल्यावर देखील ठाकरे गटाकडून याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली नव्हती. फक्त युती संदर्भात चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात आलं होतं.
एकीकडं आंबेकर व ठाकरे युती चर्चेच्या फेर्यात अडकली असतानाच दुसरीकडं मुख्यमंत्री शिंदे यांनी आंबेडकरी चळवळीतील नेते जोगेंद्र कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पार्टी या पक्षाशी युती देखील केली. मुख्यमंत्र्यांनी जलदगतीनं पावलं टाकत शिंदे गट- कवाडे गट युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. एकप्रकारे मुख्यमंत्री शिंदेंनी उध्दव ठाकरेंवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.