Ramdas kadam-Uddhav Thackeray
Ramdas kadam-Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

ठाकरेंच्या भाषणापूर्वीच रामदास कदमांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : रामदास कदम मुर्दाबाद, रामदास कदम गद्दार आहेत, अशा घोषणा आज (ता. १५ ऑक्टोबर) शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात देण्यात आल्या. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी आज माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या निषेधाच्या घोषणा सुरु झाल्या होत्या. (Proclamation of Shiv Sainiks against Ramdas Kadam)

आमदार रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधातील कागदपत्रे भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यापर्यंत पोचवल्याचा आरोप आहे. या संदर्भात आपली अकारण बदनामी केली जात आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे माझ्या सख्ख्या भावाला बरोबर घेऊन माझ्या विरोधात कुभांड रचत असल्याची व्यथा मांडणारे पत्र कदम यांनी नुकतेच मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवले आहे. तरीही मी पक्षाला महत्व देत शांत असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दसरा मेळाव्यात रामदास कदम यांच्यावर शिवसैनिक खवळतील, याची कल्पना अगोदरच आल्याने त्यांनी आज दसरा मेळाव्याला येऊ नये, यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ वर्तुळातूनच निरोप देण्यात आला होता. रोषाचे रुपांतर अप्रिय प्रसंगात झाले, तर मेळाव्याचा बेरंग होईल, असे सांगत सभागृहात येऊ नये, असा निरोप कदम यांच्यापर्यंत पोचविण्यात आला होता, असे कदम यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

शिवसेनेवरील माझी निष्ठा अभंग आहे. तेथे मी का यायचे नाही, असा सवाल करीत प्रारंभी ही विनंती माजी मंत्री रामदास कदम यांनी धुडकावून लावली होती. पण, शिवसेनेतील अंतर्गत वादाचीच चर्चा झाली तर मेळाव्यातून जो संदेश द्यायचा आहे, तो जाणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या हाती कोलित मिळेल, असे सांगत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांनी कदम यांना मेळाव्यात येणे इष्ट नसल्याचे सांगितले. आज दिवसभर शिवसेनेत या प्रकाराची चर्चा सुरु होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT