Rahul Gandhi Breaking News Sarkarnama
मुंबई

Rahul Gandhi Matoshri Visit: सर्वात मोठी बातमी! राहुल गांधी मातोश्रीवर येणार,ठाकरेंच्या राष्ट्रीय नेतृत्वावर शिक्कामोर्तब?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच सावरकरांविषयी आक्षेपार्ह विधान करत भाजपला डिवचलं होतं. त्यांच्या या विधानानंतर मोठा राजकीय गदारोळ उडाला होता. ठाकरे गटानेही राहुल गांधी यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली होती. संजय राऊतांनी देखील काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन ही नाराजी व्यक्त केली होती.

मात्र, याचदरम्यान, राज्याच्या राजकारणाला नवीन वळण देणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी थेट मातोश्रीवर येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राहुल गांधी(Rahul Gandhi) हे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर येणार असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि शिवसेनेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. या वरुन भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेनंही ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. मात्र, आता राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भेटीची तारीख गुलदस्त्यात असून या राजकीय भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. या भेटीत स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचे सूत्र यासह विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विरोधी पक्षांची मोट गांधींचं मोठं पाऊल...

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधी पक्षाची आघाडी मजबूत करण्याच्या उद्देशानं एक पाऊल गुरुवारी टाकलं. यानंतर त्यांनी भाजपविरोधात एकत्रितपणे लढणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच इतर राजकीय पक्षांशी संपर्क करणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं होतं.

...तर राहुल गांधी असे पहिलेच नेते असतील!

राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट होण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे. तसं झाल्यास मातोश्रीवर येणारे गांधी कुटुंबातील राहुल गांधी हे पहिलेच नेते ठरणार आहेत. तसेच या भेटीमुळे उद्धव ठाकरेंचं राष्ट्रीय पातळीवरचं राजकीय वजनही वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT