Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray On Mulund : '...तर गालावर वळ उठतील'; मुलुंड घटनेवर राज ठाकरे भडकले

उत्तम कुटे

Mumbai Political News : मुलुंड (पूर्व), मुंबई येथील एका सोसायटीत मराठी आहे म्हणून तृप्ती देवरुखकर या महिलेला भाड्याने कार्यालयासाठी जागा देण्यास नकार दिला. हा प्रकार समोर येताच राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटले. काँग्रेस, ठाकरे सेनेने त्याचा तीव्र निषेध केला. या प्रकाराची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दखल घेत कारवाईचा इशारा दिला.

दरम्यान, घटनास्थळी पहिली धाव घेत मराठी माणसाला जागा नाकारणाऱ्या सोसायटी सेक्रेटरीला मनसेने दणका दिला. मनसेने त्याला केलेल्या प्रकाराबद्दल माफी मागायला भाग पाडले. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुलुंडच्या घटनेची पुनरावृत्ती झाली, तर गालावर वळ उठतील, असा थेट आणि कडक इशारा दिला आहे. (Latest Political News)

मुलुंड घटनेनंतर मराठी माणूस आणि भाषेवरून आपले कार्यक्षेत्र हिंदुत्वापर्यंत व्यापक केलेली मनसे पुन्हा मराठी या आपल्या मूळ मुद्द्याकडे वळल्याचे दिसून आले आहे. मुलुंड प्रकरणावर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) शुक्रवारी चांगलेच भडकल्याचे दिसले. अशा प्रकराची पुनरावृत्ती झाली तर आता माफी नाही, तर थेट गालावर वळच उठतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकराचा भाजप वगळता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे (उबाठा) आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांनी तीव्र निषेध केला. याची राज्य मानवी हक्क आयोगानेही दखल घेतली.

आव्हाड यांनी मुलुंड घटनेवर भाष्य करताना मराठी माणसाचेच त्यांनी कान टोचले. 'मांसाहारी म्हणून गुजराती, मारवाडी आणि जैन हे आपल्या सोसायटीत ज्यांना घरे देत नाहीत, तेच मराठी लोक जात पाहून शेड्यूल्ड कास्ट लोकांना घरे नाकारतात. धर्म पाहून मुसलमानांना घर नाकारतात. शेरास सव्वाशेर गुजराथी, मारवाडी, जैन हे मराठी लोकांना जेव्हा लाथ घालतो तेव्हा हे किंचाळतात. कटू, पण सत्य आहे,' असे मत आव्हाड यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले होते.

दरम्यान, देवरुखकर यांनी फेसबुक लाइव्ह करताच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सचिव असलेल्या ठक्कर बापलेकाला माफी मागण्यास भाग पाडले. त्याबद्दल त्यांचे राज ठाकरे यांनी आज कौतुक केले. तसेच मराठी माणसाला घर नाकारणाऱ्या या घटनेवर संतापही व्यक्त केला. या घटनेचा फक्त निषेध करणाऱ्या राजकीय पक्ष आणि नेत्यांना त्यांनी आपल्या स्टाइलमध्ये सुनावले. (Maharashtra Political News)

'इतरांनी निषेध वगैरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणे असे प्रकार माहीत नाहीत', अशी कोपरखळी त्यांनी मारली. 'माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात पुन्हा हे असे काही घडले तर गालावर वळ उठतील हे निश्चित', असा थेट इशारा त्यांनी देऊन टाकला.

सरकारने, पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. 'तुमचे कायम लक्ष असतेच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झाले तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असेच सुरू राहिले पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे', अशी अपेक्षा ठाकरेंनी आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली.

दरम्यान, अजित पवारांनी या प्रकरणी कारवाईचा इशारा दिल्यानंतर लगेचच ठक्कर बापलेकाविरुद्ध पोलिसांनी मारहाण आणि धमकावल्याचा गुन्हा नोंद केला. पण, त्यात या दोघांची न्यायालयात लगेच जामिनावर सुटका झाली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT