Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray|मनसेच्या गोटातील हालचालींना वेग; राज ठाकरेंनी बोलवली तातडीची बैठक

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणूका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना आता राजकारणातही वेगवेगळे ट्विस्ट येत आहेत. शिवसेनेला एकटे पाडण्यासाठी शिंदे गट, भाजप आणि मनसे (MNS) जोरदार तयारी केली आहे.

या घडामोडींमध्ये भाजपची मनसेशी जवळीक वाढताना दिसत आहे. त्यामुळे आगामी निवडणूकांमध्ये भाजप मनसे युतीच्या चर्चाही जोर धरु लागल्या आहेत. या घडामोडींदरम्यान मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठीच मनसेच्या गोटात हालचालींनाही वेग आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (12 सप्टेंबर) सकाळी दहा वाजता मनसे नेते आणि सरचिटणीस यांच्यासोबत बैठक बोलवली आहे. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये ही बैठक होणार आहे. आता या बैठकीत राज ठाकरे काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज ठाकरे येत्या 18 सप्टेंबरपासून विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासोबतच मनसे आणि शिंदे गटाच्या युतीचीही चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु आहे. तर दूसरीकडे राज ठाकरेंनी दसरा मेळावा घेण्यासाठीही मनसे कार्यकर्ते आग्रही आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर शिंदे सेना आणि मनसे महापालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याच्याही चर्चा सुरु आहेत. तसे झाल्यास शिंदे सेनेमुळे मनसेला पुन्हा सुगीचे दिवस येतील असेही बोलले जाते. सत्ताबदलानंतर राज ठाकरेही पुन्हा सक्रिय झाले. त्यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा लावून धरला आणि काही दिवसातचं मशिदींवरील भोंगे उतरले. त्यामुळे मनसैनिकांमध्येही एक नवी उमेद पाहायला मिळाली. आता जर मनसे-शिंदे सेनेत युती झाली तर मनसेसाठी हा दुग्धशर्करा योग ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT