Prakash Mahajan, Narendra Modi, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Prakash Mahajan : राज ठाकरेंना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण नाही; महाजनांचा तिळपापड, म्हणाले, "काम झाल्यावर..."

Jagdish Patil

Prakash Mahajan On Narendra Modi swearing ceremony : नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. 9 जून) रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला एनडीएमधील नवनिर्वाचित खासदारांसह काही विरोधी आणि मित्रपक्षातील नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण का दिलं नाही? याबाबत मनसे नेते प्रकाश महाजन यांना प्रश्न विचारलं असता त्यांनी महायुती आणि भाजपला टोला लगावला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं. यानंतर मनसेचे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारात उतरल्याचं पाहायला मिळालं. यानंतर राज्यासह देशातील लोकसभेची निवडणूक पार पडली.

निवडणुकीदरम्यान, राज ठाकरे यांनी युतीच्या उमेदवारांसाठी विविध शहरात सभा घेतल्या. पुण्यात मुरलीधर मोहोळ, कोकण मतदारसंघात नारायण राणे, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे नरेश म्हस्के या उमेदवारांसाठी राज यांची तोफ धडाडली. या सर्व उमेदवारांचा विजयदेखील झाला.

मात्र, काल रविवारी (ता. 9 जून) रोजी नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याचं राज ठाकरेंना मात्र निमंत्रण नव्हतं. त्यामुळे आता मनसे नेत्यांची खदखद बाहेर आल्याचं दिसत आहे. तर भाजप हा गरज असेल तेंव्हाच उंबरठे झिजवतो आणि काम झाल्यावर दार लावून घेतो अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे.

प्रकाश महाजन म्हणाले, "मनसे एनडीएचा घटकपक्ष नाही. त्यामुळे दिल्लीतील समन्वय बैठकीला आम्हाला बोलावणे अपेक्षित नाही. मात्र, एनडीए सरकारच्या शपथविधीला मनसेला निमंत्रण देण्यात आले होते का, हे सांगणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कठीण आहे. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला बोलवलं असतं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंद झाला असता. आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला. महायुतीसाठी आमचे कार्यकर्ते राबले. आम्हाला निमंत्रण असतं तर ते कळलं असतं. मात्र राज्यात मोठं अपयश आल्याने महायुतीचे नेते आमंत्रण द्यायला विसरले असतील, असा टोला त्यांनी यावेळी महायुती आणि भाजपला लगावला.

शिवाय हे आपल्याच लोकांना आमंत्रण द्यायला विसरतात. मैत्री जपणारी पिढी आता भाजपमध्ये संपली आहे. गरज असेल तेव्हा उंबरठे झिजवायाचे आणि काम झाल्यावर दार लावायचं. त्याचे परिणाम त्यांनी लोकसभा निवडणुकीत पाहिलं, आमची त्यांच्यासोबत युती नव्हती, आमचा फक्त मोदींना पाठिंबा होता, अशी बोचरी टीकाही त्यांनी भाजपवर केली. तसंच राज ठाकरेंना निमंत्रण होते की नाही, हे फक्त राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगू शकतात, असंही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT